Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, August 14, 2026

SARA NEWS NETWORK

  सारा न्यूज नेटवर्क - 



विजापूर नाका पोलिसांची सुपरफास्ट कारवाई..!

केवळ 48 तासांत 6.75 लाखांच्या चोरीचा छडा, रिक्षासह मुद्देमाल जप्त


सोलापूर : - जुळे सोलापूर परिसरातील द प्लॅटिनो अपार्टमेंट येथील मीटर रूममधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वायर चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. मात्र, विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तब्बल ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळत या चोरीचा छडा लावला. तांत्रिक तपासाच्या आधारे चौघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या वायरचे बंडल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान केएलई शाळेजवळील द प्लॅटिनो अपार्टमेंटच्या मीटर रूममधून इलेक्ट्रिक वायरींचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


चोरीचा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळासह आसरा चौक, अमन चौक आणि नई जिंदगी परिसरातील तब्बल ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.


पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह प्लॅटिनो अपार्टमेंटमध्ये ठेकेदाराकडे कामाच्या निमित्ताने प्रवेश केला होता. एक दिवस काम केल्यानंतर परिसराची माहिती घेत त्यांनी तेथील आर.आर. केबल कंपनीच्या १.५ एमएमच्या ४५ बंडल आणि ६ एमएमच्या ५ बंडल इलेक्ट्रिक वायरवर डल्ला मारल्याचे तपासात समोर आले.


या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेली सर्व वायर तसेच चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा ६,७५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील इलेक्ट्रिक साहित्य चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


या प्रकरणी सर्फराज अ. वहाब पटवेघर (२२), अनिस उस्मान शेख (२४), रेहान जमील शेख (२०) आणि अमीन युनुस शेख (२२) या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. हे सर्व सोलापूर शहरातील अमन चौक, नई जिंदगी व नागनाथ नगर परिसरातील रहिवासी आहेत.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड करीत आहेत.


वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी


पोलीस आयुक्त एम. राजकुमार सते, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम बावलकर, सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि. गायकवाड तसेच सफौ. आप्पा पवार, पोह. सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, पोना. शंकर भिसे, पोको. राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सगाव, स्वप्नील जाधव, श्रीरंग काशिद यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.




No comments:

Post a Comment