सारा न्यूज नेटवर्क -
दसऱ्याला ‘सोने’ म्हणून लुटल्या जाणाऱ्या आपट्याच्या अस्तित्वावर संकट..!
फुलपाखरांच्या जीवनचक्रासाठीही महत्त्वाचा वृक्ष;
एकत्व सोशल फाउंडेशनचा वृक्षलागवडीतून संवर्धनाचा संदेश..
सोलापूर :- दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा मोठ्या उत्साहात जपली जाते. मात्र, ही पाने गोळा करताना आपट्याच्या झाडांची होणारी तोड आणि नव्या वृक्षांची लागवड करण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हा वृक्ष हळूहळू दुर्मीळ होत आहे. आपट्याच्या घटत्या संख्येचा परिणाम या वृक्षावर अवलंबून असलेल्या फुलपाखरांच्या जीवनचक्रावरही होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन बाळे येथील **एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी, येथील नृसिंह विद्यालयात आपट्याच्या वृक्षांची लागवड** करून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
दसरा सणाला आपटा आणि शमी या वृक्षांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. पांडवांनी अज्ञातवासापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती, अशी पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी या वृक्षांचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे. आपट्याची पाने सोने म्हणून वाटून आपुलकी व्यक्त केली जाते; मात्र ही परंपरा जपताना वृक्षांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.
पूर्वी शेताच्या बांधावर, माळरानावर आणि ओसाड जमिनीवर आपट्याची झाडे मोठ्या प्रमाणात आढळत होती. दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी पाने गोळा करण्यासाठी अनेक जण झाडांच्या फांद्या तोडतात किंवा मोठ्या प्रमाणात पाने ओरबाडतात. दुसरीकडे, या वृक्षाची नव्याने लागवड करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. परिणामी, परंपरेचा भाग असलेला हा वृक्ष भविष्यात दुर्मीळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
**आपटा हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.** काही फुलपाखरांच्या प्रजातींच्या जीवनचक्रात या वृक्षाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आपट्याची झाडे कमी झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या प्रजातींच्या अधिवासावरही परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर एकत्व सोशल फाउंडेशनने आपट्याची लागवड करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविला. दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा जपत असतानाच, प्रत्येकाने आपट्याचे किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा पर्यावरणपूरक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
याप्रसंगी : प्रशालेचे मुख्याध्यापक, म्हाळप्पा कोकरे, राजेश वाघमोडे, किरण सरवळे, पिरप्पा कोळी, राजेश केकडे, शहाबाज मकानदार , दीपक करकी,किशोर गुंड, गोरखनाथ घोडके, श्रीधर देशमुख, चेतन झाडे, वृक्षारोपणा वेळेस उपस्थिती होते.
परंपरा जपूया, वृक्षही वाचवूया दसऱ्याला आपट्याची पाने ओरबाडण्याऐवजी वृक्षांचे संरक्षण, नवीन लागवड आणि नियमित संगोपन करण्याचा संकल्प केल्यास भावी पिढ्यांनाही हा निसर्गाचा अनमोल वारसा अनुभवता येईल.
🔲*दसरा सणाला आपण आपट्याची पाने सोन म्हणून वाटतो, परंतु बाजारात सध्या आपट्याच्या नावाखाली कांचन आणि अंजन या पाण्याची सर्रासपणे विक्री केली जाते, आपट्याचे झाड दुर्मिळ होत चालले आहे, हीच बाब लक्षात घेऊन एकत्वने दरवर्षी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या युवकांना आणि जेष्ठ व्यक्तींना आपट्याच्या रोप भेट म्हणून दिले जाते, अंजन आणि कांचन हे दोन्ही वृक्ष वेगळे आहेत याची देखील जनजागृती केली जाते. यंदा वृक्ष लावून संवर्धनाचा संदेश देण्यात आला..*
दीपक करकी..
एकत्व सोशल फाउंडेशन बाळे...


No comments:
Post a Comment