Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 17, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 अशी सुरू केली सोलापूर हैदराबाद विमान सेवा -डॉ. संदीप आडके, सोलापूर विचार मंच. 

सोलापूर: - जून २०२५ मध्ये सोलापुरातून गोव्यासाठी फ्लाय ९१ कंपनीने सोलापूर विचार मंचच्या पाठपुराव्यानंतर पहिल्यांदा विमानसेवा सुरू केली. जानेवारी महिन्यामध्ये कंपनीने दोन नवीन एटीआर ७२ विमाने घेतल्याच्या कळल्यावर सोलापूर विचार मंचचे डॉ.संदीप आडके व डॉ. डायना आडके यांनी फ्लाय ९१ कंपनीचे सीईओ व एमडी श्री मनोज चाको यांची कंपनीच्या गोव्यातील मुख्यालयामध्ये जाऊन १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना सोलापुरातून हैदराबाद, तिरुपती व बेंगलोर साठी त्वरित विमानसेवा सुरू करावी ही विनंती केली होती.



 परंतु सोलापूर हैदराबाद हा स्लॉट एका कार्यान्वित नसलेल्या विमान कंपनीला देण्यात आल्याचे चाको यांनी सांगितले व त्यांची कंपनी ही दुसऱ्या क्रमांकास असल्याचे कळले. त्यामुळे डॉ.संदीप आडके यांनी लगेचच नागरी उद्ययन मंत्रालय, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, डीजीसीए, उडान, मुख्यमंत्री व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना तात्काळ ई-मेल करून सोलापूर हैदराबाद हा रूट कार्यान्वित नसलेल्या कंपनीकडून काढून घेऊन दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फ्लाय ९१ कंपनीस अवॉर्ड करावा असे कळवले होते. त्याचबरोबर सोलापुरातून सर्व विमानसेवा या उडान योजनेअंतर्गत कार्यान्वित करण्यात याव्यात अशी सुद्धा विनंती केलेली आहे. सध्याचे विमान कंपन्यांचे तिकीट दर हे जास्त असून सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. उडान योजनेअंतर्गत दोन ते अडीच हजारापर्यंत सोलापुरातून विमान सेवा देणे शक्य होईल व विमान कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळेल तसेच इतर रूट साठी विमान कंपन्या आपली सेवा देतील व त्यामुळे लवकरच सोलापूरला नाईट लँडिंगची व्यवस्था करणे सोयीस्कर होईल.

मनोज चाको यांच्याबरोबर चर्चेच्या दरम्यान सोलापुरात असलेली धार्मिक पर्यटन स्थळे, येथील पारंपारिक टॉवेल व चादरीचा जागतिक बाजारपेठ, रेडिमेड गारमेंट हब व मेडिकल हब यामुळे येथे विमानसेवेची गरज व त्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल याची हमी डॉ. आडके यांनी दिली होती. 


सोलापूर विचार मंच तर्फे चार वर्ष सातत्याने न्यायालयीन लढा व कार्यालयातील पाठपुराव्यामुळे होटगी रोड विमानतळातील अडथळा असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत को-जनरेशन चिमणी जून २०२३ मध्ये हटवण्यात यश आल्यानंतर सोलापूर विचार मंचतर्फे सातत्याने सर्व विमान कंपन्यांना सोलापुरात विमान सेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केल्याचेच व सोलापूरचे चांगले ब्रँडिंग केल्याने सोलापुरातून गोवा व मुंबई नंतर आज पासून हैदराबाद येथे देखील विमानसेवा सुरू होत आहे. मनोज चाको यांच्याशी गोव्यात जाऊन केलेली प्रत्यक्ष भेट याचेच हे फलित असल्याचे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले. सोलापुरातील अनेक धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देण्याची मनोज चाको यांची इच्छा असल्याचे त्यांनी या भेटीदरम्यान सांगितले व सोलापूर विचार मंच तर्फे डॉ.आडके यांनी लवकरच सोलापुरात येण्याचे त्यांना आमंत्रण दिले. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment