सारा न्यूज नेटवर्क -
स्वामीनाम कै.आशाताईंच्या अंतरआत्म्यात वसले आहे - महेश इंगळे
कै.आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रध्दांजली..
अक्कलकोट :- सुप्रसिद्ध गायिका कै.आशाताई भोसले यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. ऐकून मनस्वी दुःख झाले, कारण ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या भक्ती परंपरेच्या माध्यमातून कै.आशाताई भोसले यांच्या सोबत अगदी सलोख्याचे ऋणानुबंध निर्माण झाले होते.
भारतीय संगीत विश्वातील सुप्रसिद्ध गायिका कै.आशाताई भोसले यांनी आपल्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व दिले. श्री स्वामी समर्थांवरील भक्तीमुळे ते सतत स्वामी नामाचे चिंतन करीत असत. अलीकडील काळात वाढत्या वयात देखील ते स्वामींचे नेहमीच स्मरण करीत राहीले. येथील श्री स्वामी समर्थांच्या मुळ प्रसन्न भावमुद्रेला जेंव्हा जेंव्हा पाहण्याची इच्छा होत असे तेंव्हा ते मला आवर्जून फोन करून व्हीडीओ कॉल द्वारे स्वामी दर्शन घडवा असे आवर्जुन सांगत असत. श्री स्वामी समर्थांवरील भक्तीमुळे व त्यांच्या शांत चित्त स्वभावामुळे त्यांना गायन क्षेत्रात प्रचंड यश मिळाले आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी कै.लतादिदी यांच्या समवेत भारतीय संगीत क्षेत्राला अजरामर केले आहे. ज्याच्या माध्यमातून भविष्यात कित्येक पिढ्यांसाठी त्यांची ध्वनी व स्वर अमर आहे. आज शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी संगीत क्षेत्रातील आपले गायन व ध्वनी मुद्रणातून ते नेहमीच आपल्या सर्वांच्या सोबत आहेत.
गतवर्षी ते श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीच्या कार्याची अगदी मनोभावे विचारपूस केली. त्या प्रसंगी त्यांच्यासोबत अगदी मनापासुन मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला. याप्रसंगी त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व स्वामींच्या मूर्ती समोर बसून तारक मंत्र सुद्धा गायले होते. मंदीर समितीच्या वतीने झालेल्या सत्काराच्या माध्यमातून लाभलेले श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आपल्यासाठी मोठे आशीर्वाद असल्याचे मोठया मनाने सांगीतले होते. त्या प्रसंगी स्वामीनामाची महती मला या स्वामींच्या नामचिंतनाने ही महती कळाली आहे. यामुळे स्वामीनाम हेच माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ धन आहे, कारण श्री स्वामी समर्थ महाराजानी या वटवृक्षाखाली बसून साधना केली आहे, तो वटवृक्ष नामस्मरणरूपी सावली आहे. यात आपल्या ऐश्वर्याचा आनंद सामावलेला आहे. हा आनंद आपणाला वटवृक्षाच्या सावलीने व स्वामींच्या दर्शनातून भेटतो. त्यामुळे या प्रेरणेतून आज येथे स्वामींच्या मंदिरात बसून तारक मंत्र म्हटले आहे. उर्वरित आयुष्यही स्वामींच्या नामस्मरणातच व्यतीत करून जीवन सार्थकी करायचं असल्याचे मनोगतही
जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्या प्रसंगी व्यक्त केले होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून त्यांच्या सोबत झालेले हे भावपुर्ण संभाषण व आठवणी यांना त्यांच्या आयुष्यातील अंतीम टप्प्यावर आज उजाळा मिळाला. असो.
ईश्वर इच्छे पुढे शेवटी मानवी जीवन हतलल आहे. नश्वर मानवी जीवन आपले संगीत व गायन सेवेच्या माध्यमातून दुसऱ्याला आनंद देण्यासाठी कै.आशाताई भोसले यांनी सार्थकी लावले आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे हे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. कै.आशाताई भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात जी पोकळी निर्माण होईल ती कधीही न भरून निघणारी आहे.
कै.आशाताई भोसले यांच्या निधनाने भोसले कुटूंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या भोसले कुटूंबियांच्या दुःखात मी व माझे कुटूंब तसेच सर्व विश्वस्त पदाधिकारी व मित्र परिवार हे सर्व अत्यंत शोकाकूल भावनेने सहभागी आहोत. या दुःखातून लवकरात लवकर सावरण्याचे बळ श्री स्वामी समर्थानी कै.आशाताई भोसले यांच्या कुटूंबीयांना द्यावे अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून कै.आशाताई भोसले यांच्या प्रती भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.
॥ श्री.स्वामी समर्थ ॥
शोकाकूल
श्री.महेश क. इंगळे
चेअरमन - श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट
मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, नगर परिषद, अक्कलकोट.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment