सारा न्यूज नेटवर्क -
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
केकऐवजी कलिंगड कापून पर्यावरणपूरक संदेश; विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
सोलापूर (दि. १६ एप्रिल) : सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वात युवा उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
वाढदिवसाची सुरुवात महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत करण्यात आली. पाश्चात्य पद्धतीने केक न कापता, पर्यावरणपूरक संदेश देत कलिंगड कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक राज्यकर पाटील, सत्यजित वाघमोडे, विशेष कार्यकारी अधिकारी व मंडल अध्यक्ष महेश देवकर, केंद्रप्रमुख कृष्ण परम सुतार, नारायणकर सर, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दत्तक घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी कपाट, महापुरुषांच्या विचारांची पुस्तके आणि जनरल नॉलेजची पुस्तके देण्यात आली. यामध्ये भगवद्गीता, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समावेश होता. शाळेला संविधानाची मोठी प्रतही भेट देण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत इको नेचर क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. झाडांच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड बसविण्यात आले तसेच पक्ष्यांसाठी घरटी व जलपात्रांची व्यवस्था करण्यात आली. शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली उभारण्यात आली असून ही शाळा डिजिटल शाळा म्हणूनही ओळखली जाते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एनर्जी ग्लुकोजचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकमुक्त सोलापूर अभियानासाठी कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले तसेच घरात रोप लावण्यासाठी औषधी वनस्पतींच्या बियांचे वाटप करण्यात आले. शाळा परिसरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.
याशिवाय विविध गोशाळांना भेट देऊन गायींसाठी चारा व जलकुंभ देण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आले.
महिला सक्षमीकरणासाठी प्रभाग व शहरातील ३०० महिलांना पंतप्रधान स्वनिधी योजनेतून प्रत्येकी ₹१५,००० व्यवसायवृद्धीसाठी देण्यात आले. तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. कुष्ठरोग बांधव वसाहतीत फळ वाटप तसेच बेघर व निराधार नागरिकांना अन्नदान करण्यात आले. लोकमंगल अन्नपूर्णा योजनेलाही सदिच्छा भेट देण्यात आली.
उपमहापौर देवकर यांच्या या सामाजिक संकल्पनेला सर्व नगरसेवकांनी प्रतिसाद देत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील मंत्री, आमदार, उद्योजक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी उपमहापौर देवकर यांनी “स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर” या संकल्पनेला कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता पुढील काळातही सातत्याने राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment