सारा न्यूज नेटवर्क -
अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ॲक्शन मोडवर ;
ऑनलाईन बुकिंग करूनही गॅस नाही, तक्रारी वाढताच थेट परवाना रद्द करण्याचा इशारा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, “ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नाही” अशी सर्वसामान्यांची नाराजी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वितरण विभागाने तातडीने कारवाई करत संबंधित गॅस एजन्सींवर तपास मोहीम राबवली.
अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकाने शहरातील प्रमुख गॅस एजन्सींना अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये देविका गॅस एजन्सी (जुळे सोलापूर), स्वामी समर्थ गॅस एजन्सी आणि गिरीधर गॅस एजन्सी यांचा समावेश होता.
तपासादरम्यान अनेक गॅसधारकांनी खालील समस्या मांडल्या:
- ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलेंडर मिळत नाही.
- बुकिंग नंबर असूनही प्रतीक्षा कालावधी वाढतो.
- काही ठिकाणी एजन्सीसमोर प्रत्यक्ष रांगा लावाव्या लागत आहेत.
- घरपोच वितरणाची सुविधा प्रभावीपणे दिली जात नाही.
पथकाने संबंधित एजन्सींच्या कर्मचाऱ्यांकडून वितरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. अनियमितता आढळल्याने एजन्सींना खालील सूचना देण्यात आल्या:
- गॅस वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत ठेवावी
- ऑनलाईन बुकिंगनुसार प्राधान्याने पुरवठा करावा
- ग्राहकांना अनावश्यक रांगा लावण्यास भाग पाडू नये
- घरपोच गॅस वितरण अनिवार्यपणे सुनिश्चित करावे
जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश -
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनांनुसार कोणत्याही गॅस एजन्सीने गोडाऊनबाहेर ग्राहकांच्या रांगा लावू नयेत, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना घरपोच सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या कारवाईत परिमंडळ अधिकारी ब विभाग राजेश यमपुरे क विभाग प्रफुल्ल नाईक अ विभाग नंदकिशोर ढोके व अन्य पुरवठा विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी संयुक्तरीत्या तपास मोहीम राबवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांचा इशारा
अन्नधान्य वितरण विभागाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या तक्रारींवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, गरज पडल्यास परवाना रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment