सारा न्यूज नेटवर्क -
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश;
तक्रारदारास एकुण ४५,६६१/- रुपये ३० दिवसात देण्याचा आदेश...
सोलापूर (प्रतिनिधी) :- या मध्ये हकिकत अशी की, कु.वैष्णवी आदिनाथ पवार हिने आकाश इन्स्टिट्यूटस यांचेकडे JEE परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश घेतला होता. परंतु तेथील शिकवलेले समजत नसल्याने कु. वैष्णवी हिने शिक्षकांकडे तशी तक्रार केली. त्यावेळेस त्यांनी आम्ही जसे शिकवू तसेच शिकावे लागेल असे सांगून आपली शिकवण्याची पद्धत बदलण्यास नकार दिला. त्यामुळे कु. वैष्णवी हिने तिची भरलेली फी परत करण्यास विनंती केली. त्या विनंतीसही धुडकावून आकाश इन्स्टिट्यूटस यांनी तुमची फी दिल्लीला जमा केली आहे त्यामुळे परत मिळणार नाही असे सांगितले.
त्यामुळे कु. वैष्णवी हिने अँड. मृणाल कुबेर यांच्यामार्फत सोलापूर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे तक्रार दाखल दिली. त्यामध्ये आकाश इन्स्टिट्यूटस यांनी शैक्षणिक संस्था या ग्राहक सरंक्षण कायद्याखालील व्याख्येत सेवा देणारी संस्था म्हणून येत नाही असा बचाव घेतला व त्या पुष्ठर्थ वेगवेगळ्या न्यायालयाचे न्यायनिवाड्याचे दाखले दिले.
याउलट तक्रारदाराचे वकिलामार्फत ज्या शैक्षणिक संस्था UGC, AICTE, STATE UNIVERSITIES, CENTRAL BOARDS, STATE BOARDS अंतर्गत येतात त्या ग्राहक संरक्षण कायद्यात समाविष्ठ होत नाहीत. परंतु आकाश इन्स्टिट्यूटस ही Companies Act प्रमाणे रजिस्टर खाजगी कंपनी असून पैशांच्या मोबदल्यात सेवा देणारी संस्था आहे. त्यामुळे आकाश इन्स्टिटय़ूट हे सेवा देणारी संस्था असून ग्राहक सरंक्षण कायद्या अंतर्गत सेवा देणार म्हणून येतात. सदर आकाश इन्स्टिट्यूटस लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत असल्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. तरीसुद्धा त्यांच्या व्यवसाय करण्यात कोणताही फरक पडलेला नाही. सदर मुजोरपणामुळे तक्रारदारासारखाच अनेक विद्यार्थ्यांना वाईट अनुभव आलेला आहे. पण अनेक विद्यार्थी आवाज न उठवता न्याय मिळणार नाही या भ्रमात शांत बसतात. त्यामुळे सदर तक्रार मंजूर केल्यास आकाश इन्स्टिट्यूटसच्या मुजोरपणास चाप बसणार आहे व एक उदाहरण तयार होणार आहे असा युक्तिवाद केला.
त्यावर मे. आयोगाचे अध्यक्ष श्री. अ.सि. भैसारे व सदस्या सौ. बी.एम. महंत-गजरे यांनी आकाश इन्स्टिट्यूटस यांनी शिकवण्याच्या पद्धतीत बदल न करता व तक्रारदाराची फी परत न करता त्रुटीयुक्त सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदारास ३०,६६१/- रुपये इतकी फी, मानसिक त्रासापोटी १०,०००/- रुपये व तक्रारीचे खर्चापोटी ५,०००/- रुपये ३० दिवसात देण्याचा आदेश आकाश इन्स्टिट्यूटसला दिला आहे.
यामध्ये तक्रारदारातर्फे अँड. मृणाल कुबेर तर आकाश इन्स्टिट्यूटस कडून अँड. सोपान शिंदे यांनी काम पहिले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment