सारा न्यूज नेटवर्क -
"स्वाधार" योजनेतील एटीकेटीच्या अटीमुळे शेकडो विद्यार्थी लाभापासून वंचित;
अट रद्द करण्याची आरपीआय (ए) ची मागणी
सोलापूर, दि. २४ जून २०२६ : - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये एटीकेटीची अट घातल्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेकडो गरजू विद्यार्थी आर्थिक लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सतिश हरिबा शिंदे यांनी केला आहे.
करा काय आहे प्रकरण
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २६ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, दोन वेळा एटीकेटी घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ नाकारण्यात आला आहे. या जाचक अटीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ आली आहे.
आरपीआय (ए) च्या म्हणण्यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नियमानुसार एटीकेटी असतानाही विद्यार्थ्याला पुढील वर्गात प्रवेश मिळतो. पहिल्या वर्षातील एटीकेटी पुढील वर्षात उत्तीर्ण केल्यास शैक्षणिक नुकसान मानले जात नाही. सलग दोन वर्ष एटीकेटी राहिल्यासच पुढील प्रवेशावर परिणाम होतो. त्यामुळे केवळ एटीकेटीच्या आधारे आर्थिक सहाय्य रोखणे अन्यायकारक आहे.
आरपीआय (ए) ची मागणी
स्वाधार योजनेचा लाभ विद्यापीठाच्या प्रवेश नियमांशी सुसंगत ठेवून पात्र विद्यार्थ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी सतिश शिंदे यांनी केली आहे. संबंधित परिपत्रकातील तरतूद तातडीने रद्द करावी, असे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले आहे.
आंदोलनाचा इशारा
वरील जाचक अट रद्द न केल्यास प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी विशाल माने, राहुल बनसोडे, संतोष पवार, सुनिल रणखांबे, विकास गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment