सारा न्यूज नेटवर्क -
निसर्गाचा!'अजब नियम सोबत जगले अन सोबतच गेले';
मंद्रुपमधील 'वृद्ध दाम्पत्याचा एकाच वेळी मृत्यू,' घटनेने गावात हळहळ....
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
मंद्रूप मध्ये एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि चकित करणारी घटना समोर आली आहे. मंद्रूप येथे राहात असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा केवळ काही तासाच्या अंतराने मृत्यू झाला आहे.
आयुष्यभर एकमेकांना साथ देत त्यांनी संसाराचा गाडा हाकला. त्यांची ही साथ मृत्यूनंतरही कायम राहिली. पत्नीच्या निधनाचा शब्द कानावर पडताच पतीनेही प्राण सोडला. मंद्रुपमध्ये
घडलेल्या या हृदयस्पर्शी घटनेने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
रामण्णा जगन्नाथ लाडर (वय ७५) व पद्मावती रामण्णा लाडर (वय ७०) राहणार विठाईनगर मंद्रूप असे एकाच दिवशी मृत्यू झालेल्या दांपत्याचे नाव आहे. रामनाथ लाडर हे मूळचे कर्नाटकातील जिगजेणी गावचे. मंद्रूप ही त्यांची सासरवाडी. कर्नाटकात शिक्षक म्हणून ते नोकरीस होते. मात्र सेवानिवृत्तीनंतर ते मंद्रूपला स्थायिक झाले होते.
लाडर गुरुजी यांना नाटकाचा व भजनाचा छंद होता. मंद्रुपच्या विठाईनगर येथील दत्त मंदिराचे पुजारी होते. मंद्रूप मधील हनुमान भजनी मंडळात त्यांचा सहभाग होता.
गेल्या काही महिन्यांपूर्वी घरातच ते पाय घसरून पडले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांची सेवा करीत असताना पत्नी पद्मावती याही घरातच पडल्याने त्यांनाही दुखापत झाली होती. तेव्हापासून दोघे वृद्ध पती-पत्नी अंथरुणाला खिळून होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोघांनाही हालचाल करणे कठीण झाले होते. मुलगा महेश व त्याची पत्नी त्यांची अहोरात्र सेवा करत होते. आज सोमवारी सकाळी सात वाजता पद्मावती यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे घरात दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा व सून यांचा आक्रोश सुरू झाला.
चार वाजता आमचे संस्कार करण्याचे ठरले तसा निरोप पाहुण्यांना देण्यात आला.
दरम्यान घरातील रडण्याचा आवाज आणि पत्नीच्या निधनाचा शब्द कानावर पडताच रामण्णा गुरुजी अस्वस्थ झाले. आयुष्यभर सुख-दुःखात साथ देणारी जीवनसाथी आता कायमची दूर गेल्याची जाणीव होताच काही क्षणांतच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा नातेवाईकांना दोघांच्याही निधनाची वार्ता कळवावी लागली. एकाच दिवशी वृद्ध दाम्पत्याचे निधन झाले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. 'एकत्र जगू आणि एकत्र मरू' या उक्तीचा प्रत्यय या दाम्पत्याने दिला. अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहिलेल्या या दाम्पत्याने मृत्यूतही एकमेकांची साथ न सोडल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनामुळे मंद्रूपमध्ये शोककळा पसरली. रात्री साडेआठ वाजता दोघांच्याही पार्थिवावर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे
No comments:
Post a Comment