Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, June 2, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

सलगर वस्तीतील ११८ झाडांची कत्तल; 

जागा मालकावर कोटींचा दंड होण्याची शक्यता..!

सोलापूर, दि. २ जून २०२६ : सलगर वस्ती परिसरात झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, संबंधित जागा मालकावर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड आकारला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून तोडण्यात आलेल्या झाडांचे मूल्यांकन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलगर वस्ती परिसरात सुमारे ७४ मीटर रस्त्यालगत असलेल्या जागेवरील तब्बल ११८ झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आली होती. या प्रकरणाची दखल घेत महापालिका आणि वनविभागाने संयुक्तपणे चौकशी सुरू केली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या तक्रारीनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, वाहन चालकासह चार जणांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन झाडांच्या नुकसानीचे प्राथमिक मूल्यांकन केले. झाडांची संख्या, वय, प्रजाती आणि पर्यावरणीय नुकसान यांचा विचार करून अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे दंडाची रक्कम निश्चित केली जाईल.

वनाधिकारी रोहित गांगुर्डे यांनी सांगितले की, प्राथमिक पाहणी पूर्ण झाली असून पुढील दोन दिवसांत सविस्तर अहवाल महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. अहवालानुसार झालेल्या नुकसानीची रक्कम मोठी असल्यास जागा मालकावर कोटी रुपयांहून अधिक दंड आकारला जाऊ शकतो.

दरम्यान, या प्रकरणात दोषींवर फौजदारी कारवाईचीही शक्यता असून, पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 






No comments:

Post a Comment