सारा न्यूज नेटवर्क -
सोलापुरातील हजारो कोटींचा भूखंड घोटाळा उघड - बोगस उमा संस्थांवर प्रशासक, सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश..
जुनी मिलच्या १३७ एकर जागेतील सर्व बोगस उमा सहकारी व इतर गृहनिर्माण संस्था अवसायनात व प्रशासकांची नियुक्ती- सर्व अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामावर कारवाईस सुरुवात.
सोलापूर (प्रतिनिधी) : - कुमार शंकर करजगी याने १६/०१/१९९८ ला स्थापन केलेली बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सोलापूर ही संस्था डॉ. प्रगती बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी दि.२९/०५/२०२६ च्या आदेशानुसार अवसायनात काढून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री दत्तात्रय कारंडे यांची नियुक्ती केली आहे. याआधी उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक १,२,३,४,५,६,७,८,९,१०,१२ब,१२क,१३,१३अ,१३ब,१४, वॉटर फ्रंट फेज १ व २, द स्क्वेअर फ्लॅट अँड शॉप ओनर्स को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, सोलापूर अशा १९ सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात काढलेल्या आहेत. या संस्थांनी माहिती न देणे ,ऑडिट रिपोर्ट न देणे, निवडणुका न घेणे. तसेच नोंदणी व व्यवस्थापन शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये या संस्था अवसायनात काढून त्यावर विविध अवसायिकांची नियुक्ती केलेली आहे.
सदर मूळ उमा सहकारी गृहनिर्माण संस्था कुमार शंकर करजगी याने बोगस कागदपत्राद्वारे व उपनिबंधक सहकारी संस्था अधिकाऱ्यांशी संगनमत करून १९९८ साली नोंद केलेली होती व त्यापुढे सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या २० पोट संस्था बनवण्यात आलेल्या होत्या. सुरुवातीला बाळे येथील स्वतःच्या वडिलांच्या गट नंबर १/१ या शेत जमिनीवर बोगस पद्धतीने याची नोंद करून घेतली व नंतर नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने जुनी मील ट्रस्टच्या १३७ एकर जागेवर या संस्थांचे बोगस पद्धतीने नाव लावण्यात आलेले होते. सदर जागा जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, कंबर तलावाजवळील मोतीबाग, उमा नगरी, एसटी स्टँड समोरील धरमसी लाईन अशा पाच विविध ठिकाणी आहे. आज सुद्धा बाळेतील ही मूळ जमीन कृषक असून त्याचा विकास केलेला नाही व कुमार शंकर करजगी यांच्याच नावे आहे.
सोलापुरातील जुनी मील बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर या ट्रस्टची १३७ एकर जागा १९८९ साली मुंबई उच्च न्यायालयातून ट्रस्टच्या अकराशे सदस्यांनी नऊ कोटी छत्तीस लाख रुपये भरून ट्रस्टच्या नावे घेतलेली होती. कुमार करजगी ,स्वर्गीय शरद मुथा , सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या हस्तकांनी या जुनी मील जागेच्या भूखंडाचा घोटाळा करून या जागा बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे बोगस कागदपत्राद्वारे विकल्या, अनेक बिल्डरांबरोबर खोटे करार करून इमारती बांधल्या व अनधिकृत पणे गहाण दिलेल्या होत्या. याबाबतीत या तिघांवर २०१७ ला फौजदारी गुन्हे दाखल होऊन सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये दावा सुरू आहे व कुमार करजगी व सुरेंद्र कर्णिक हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत.
या सोसायट्यांच्या सर्व जागेचे व्यवहार हे अनधिकृत ठरले आहेत. तेथील ले आउट रद्द करण्यात आलेले आहेत, नगर भूमापन कार्यालयाने येथील मोजणी बंद केलेली आहे. दुय्यम निबंधकाकडे खरेदी-विक्री बंद करण्यात आलेली आहे. सोलापूर महानगरपालिकेने येथील बांधकाम परवाने बंद करून आतापर्यंतच्या कोणत्याही बांधकामास वापर परवाना दिलेला नाही. जुनी मील ट्रस्टची १३७ एकर जागेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांकडे २०१९ मध्ये करण्यात आलेली आहे. ट्रस्टच्या जागेतील आतापर्यंत केलेले सर्व व्यवहार हे धर्मादाय आयुक्त यांच्या परवानगी विना केल्यामुळे तेथील सर्व खरेदी विक्री ,बांधकामे ही अवैध ठरलेली आहेत.
या जागेमध्ये कुमार शंकर करजगी याने अनेक बेकायदा बांधकामे केलेली आहेत, बोगस करार करून या जागेमध्ये सद्गुरु ऍडव्हर्टायझर्स व शुभम एंटरप्राइजेस यांनी बोगस कागदपत्राद्वारे महानगरपालिकेतील अधिकाऱ्याच्या संगनमताने १६ बोगस होर्डिंग उभारलेली आहेत. या जागांमध्ये ब्रह्मकुमारी ,यशराज चौपाटी, यशराज मोटर्स, यशराज लॉन्स, यशराज टायर्स, यशराज गादी सेंटर, आस्क मोटर्स, रूमा कार वर्ल्ड , आशा फर्निचर, समीर प्लायवूड, सुरभी कार स्पा, कॅफे डायमंड किंग, सवेरा कार सर्विस, नॅशनल मोटर्स , इंडिया मोटर्स, खिलौना मोटर्स , टर्फ एरीना असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक जागा या ट्रस्टतर्फे जुना पुना नाका ते पत्रकार भवन चौक या उड्डाणपुलासाठी महानगरपालिकेस दिलेल्या आहेत असे असताना सुद्धा महानगरपालिकेच्या जागांवर सुद्धा असे अतिक्रमण झालेले आहे. याबाबत पोलीस, प्रशासन, महानगरपालिका व संबंधित इतर खात्यांना वारंवार आम्ही तक्रारी करून सुद्धा ही अतिक्रमणे व अवैध बांधकामे आज पर्यंत हटवली गेली नाहीत अथवा त्यांच्यावर कोणतीही पोलीस केस दाखल करण्यात आलेली नाही.
या १३७ एकर जागेतील सर्व अवैध बांधकाम वअतिक्रमण धारकांना संस्थेतर्फे सदर जागा सोडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत व जे कोणी संस्थेची जागा रिकामी करणार नाहीत त्यांच्यावर ट्रेस पासिंग व संस्थेची जागा अनाधिकृतपणे बळकवाल्याबद्दल पोलीस तक्रार व फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे या जागेची खरेदी विक्री, गहाण असे कोणतेही व्यवहार कोणीही करू नयेत असे संस्थेचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी सर्व नागरिकांना कळवलेले आहे.
१९८८ सालापासून पैसे भरून जागा घेण्यासाठी वाट बघणाऱ्या जुनी मिल ट्रस्टच्या अकराशे सभासदांना आता त्यांच्या हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे व लवकरच कायदेशीर मार्गाने सर्व जागेचे वाटप करण्यात येईल असेही डॉ.संदीप आडके यांनी सांगितले आहे. यामुळे गेल्या ३६ वर्ष सोलापुरात गाजत असलेला १३७ एकर जागेचा हजारो कोटींचा भूखंड घोटाळा करणाऱ्या कुमार करजगी व त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे
No comments:
Post a Comment