सारा न्यूज नेटवर्क -
ग्रामीण पत्रकारांना मोफत एसटी प्रवासाच्या मागणीसाठी काळी फीत-टोपी घालून आंदोलन
रविवार, 21 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरणार
जिल्हाध्यक्ष डॉ.राम हुंडारे यांचा सहभाग
सोलापूर (प्रतिनिधी) : – लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी बातमीसाठी ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाले आहे. वार्तांकनासाठी ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मोटारसायकलने धोकादायक प्रवास करावा लागतो. अल्प मानधनामुळे पेट्रोलचा खर्चही परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास मिळावा, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक झाली आहे.
समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील 'आंदोलन गेट' येथे काळी फीत व काळी टोपी परिधान करून आंदोलन छेडण्यात येणार आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा निषेध असेल.
निवेदन देऊनही निर्णय नाही
पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी 6 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी आणि 5 मार्च 2026 रोजी पुणे विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडेही पत्रव्यवहार करून ग्रामीण पत्रकारांना मोफत एसटी प्रवासाची सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. सोलापुरात लाक्षणिक आंदोलनही झाले. मात्र, राज्य सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.
जिल्हाध्यक्ष राम हुंडारे यांचा सहभाग
या आंदोलनात पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे हेदेखील सक्रिय सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग तसेच मंत्री-आमदारांचे दौरे कव्हर करण्यासाठी वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. खाजगी वाहन परवडत नसल्याने मोफत एसटी प्रवास ही काळाची गरज असल्याचे हुंडारे यांनी सांगितले.
प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यभरातील पत्रकार बांधवांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे

No comments:
Post a Comment