Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, June 18, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मंद्रूपमध्ये टाकी न धुता ओतले टँकरने पाणी..!

टाकी स्वच्छता विसरली ग्रामपंचायत; ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ.? 


मंद्रूप, दि. १८ जून (प्रतिनिधी) : महिनाभर पाणीटंचाई सहन करणाऱ्या मंद्रूपकरांच्या नशिबी अखेर दूषित पाणीच आले. ग्रामपंचायतीच्या दोन्ही जलवाहिन्या बंद असल्याने सोलापूर शहरातून टँकरद्वारे पाणी आणले जात आहे. मात्र अंडरग्राउंड टाकीची सफाई न करताच टँकरचे पाणी ओतल्याने संपूर्ण पाणीपुरवठा गढूळ व दूषित झाला आहे. 


नेमके काय घडले.? 

गेल्या महिनाभरापासून मंद्रूपच्या दोन्ही जलवाहिन्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बुधवारी प्रथमच नळाद्वारे घरोघरी पाणी सोडण्यात आले. मात्र नळ सुरू करताच सुमारे 15 मिनिटे गढूळ, काळपट व दुर्गंधीयुक्त पाणी आले. 

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरग्राउंड टाकीमध्ये महिनाभरापासून शिल्लक असलेले अत्यंत घाण पाणी होते. ती टाकी न धुता थेट टँकरचे पाणी त्यात ओतले गेले. तेच पाणी उपसा करून उंच टाकीत सोडल्याने संपूर्ण गावात दूषित पाणीपुरवठा झाला.



ग्रामस्थांचा संताप : 

"महिनाभर पाण्यासाठी वणवण केली. आता पाणी आले तर तेही पिण्यालायक नाही. लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे," असे एका ग्रामस्थाने सांगितले. टाकी स्वच्छ न करता पाणीपुरवठा करणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


प्रशासनासमोरील मागण्या :

1.तातडीने अंडरग्राउंड व उंच टाकीची संपूर्ण सफाई करावी. 

2.पाणीपुरवठ्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता तपासून अहवाल सार्वजनिक करावा. 

3.टँकरचे पाणी कुठून भरले जाते याची माहिती फलकाद्वारे द्यावी. 

4.जलवाहिन्या तातडीने दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.

दरम्यान, या प्रकारामुळे गावात साथीच्या आजाराची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मंद्रूप ग्रामपंचायत प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment