Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, October 21, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 मोठी बातमी..! पाण्याची नासाडी करणाऱ्या ५ नागरिकांना दंड; महापालिका आयुक्तांच्या पाहणीत कारवाई.. 


सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना पाण्याची नासाडी करणाऱ्या पाच नागरिकांना महापालिकेने प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठावला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कुमठे गावातील मड्डी वस्ती परिसराच्या पाहणीदरम्यान ही कारवाई केली. नळांना तोट्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून रस्त्यावर जात असल्याचे निदर्शनास आले.


शहरातील नाले, डी.पी. रस्ते आणि पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी युगंधर हॉस्पिटल परिसरातील नाला, डी.पी. रस्ता, मजरेवाडी येथील नाला तसेच कुमठे गावातील मड्डी वस्ती परिसराला भेट दिली. यावेळी नाल्यांची सद्यस्थिती, पाण्याचा निचरा, परिसरातील स्वच्छता आणि रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.


कुमठे गावात पाणीपुरवठ्याचा दिवस असल्याने पाहणीदरम्यान काही नागरिकांच्या नळजोडण्यांना तोट्या नसल्याचे आढळले. त्यामुळे नळांतून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते आणि ते थेट रस्त्यावर जात होते. शहरात पाणीटंचाई असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने महापालिका प्रशासनाने संबंधित पाच नागरिकांवर प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली.




 

नाल्यांमधील अडथळे दूर करण्याच्या सूचना


पाहणीदरम्यान नाल्यांमधील अडथळे दूर करून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवावा, परिसरात स्वच्छता राखावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, नगर अभियंता नीलकंठ मठपती, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, मुख्य आरोग्य निरीक्षक लोखंडे, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता तसेच नाल्यांच्या कामाशी संबंधित सल्लागार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


पाणी जपून वापरण्याचे आवाहन

सोलापूर शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. नळांना योग्य तोट्या बसवाव्यात, विनाकारण नळ सुरू ठेवू नयेत आणि पाणी रस्त्यावर वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पिण्याचे पाणी वाहन धुणे, रस्ते धुणे किंवा अन्य अनावश्यक कामांसाठी वापरणे टाळावे, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.


पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही तपासणी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.





No comments:

Post a Comment