Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, November 27, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



२६/११ च्या शहीदांना रक्तदानाचा मानवतेचा सलाम! वळसंग पोलिसांच्या उपक्रमात ७७ जणांचे रक्तदान.!

महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षा, नशामुक्ती आणि वृक्षारोपणातून जनजागृती.. 


वळसंग (प्रतिनिधी) :दक्षिण सोलापूर

 मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ७७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.


जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


यावेळी रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि अमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकाच्या प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे तसेच महिलांनी आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.





यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी सामाजिक उपक्रमांचे महत्त्व विशद करत पोलीस दलाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. माजी पोलीस अधिकारी संजय मोतेकर यांनी २६/११ च्या शहीदांचे बलिदान सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सहायक पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी आभार प्रदर्शन करत रक्तदान, नशामुक्ती आणि महिला सक्षमीकरण हे समाजहिताचे महत्त्वाचे उपक्रम असल्याचे नमूद केले.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले. शहीदांना अभिवादन करण्यासोबतच समाजात जनजागृती आणि माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.



No comments:

Post a Comment