सारा न्यूज नेटवर्क -
सिमेंट व साखर कारखान्यांच्या वाहतुकीला शिस्त लावणार; वळसंग पोलिसांची संयुक्त बैठक.!
औद्योगिक आस्थापने, परिवहन व बांधकाम विभागाची संयुक्त बैठक; अपघात रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम
वळसंग (प्रतिनिधी) :दक्षिण सोलापूर
औद्योगिक वाहतूक आणि ऊस वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाढणारा अपघातांचा धोका लक्षात घेऊन जड वाहनांच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वळसंग पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. अपघातांना आळा घालणे, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सोमवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी वळसंग पोलीस ठाण्यात विविध औद्योगिक आस्थापनांचे व्यवस्थापक, शासकीय विभागांचे अधिकारी आणि पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीस चट्टीनाड सिमेंट फॅक्टरी, बिर्ला सिमेंट फॅक्टरी, झुआरी सिमेंट फॅक्टरी तसेच एनटीपीसी फटाटेवाडी येथील व्यवस्थापक उपस्थित होते. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग, सोलापूर येथील अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.
बैठकीत सिमेंट कारखान्यांमधून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, वाहनांची सुरक्षितता तपासणे, चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिवेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
ऊस वाहतुकीमुळेही ग्रामीण रस्त्यांवर अपघातांचा धोका वाढत असल्याने जय हिंद साखर कारखाना, आचेगाव आणि ओंकार शुगर कारखाना, धोत्री यांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या. प्रत्येक गावात ऊस वाहतुकीदरम्यान सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे तसेच कारखान्याचे नाव असलेले ठळक फलक लावणे बंधनकारक करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वळसंग पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने संबंधित रस्त्यांवर अवजड वाहतूक, अतिवेग आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. गावातील वाहतुकीवर लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना किंवा समस्या निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीस पाटलांना करण्यात आले.
वाहतूक अपघातांमुळे गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी औद्योगिक आस्थापना, शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्तरावरील प्रतिनिधींनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस विविध शासकीय विभागांचे 8 अधिकारी, 26 पोलीस पाटील आणि विविध गावांतील 25 नागरिक असे एकूण 59 जण उपस्थित होते. रस्ते सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश देत अपघात प्रतिबंधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



No comments:
Post a Comment