Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, November 21, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 प्रसादाच्या नावाखाली गुंगीची चिक्की; ५० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास.!

कर्नाटक एक्स्प्रेसमधील धक्कादायक चोरीचा सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी लावला छडा; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून रेकॉर्डवरील महिला आरोपी जेरबंद, न्यायालयाकडून १० दिवसांची पोलीस कोठडी


सोलापूर :- रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तीशी वाढवलेली ओळख किती महागात पडू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय एका दाम्पत्याला आला आहे. प्रसाद देण्याच्या बहाण्याने गुंगीकारक औषध मिसळलेली चिक्की खायला देऊन दाम्पत्याला बेशुद्धावस्थेत नेले आणि तब्बल ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. मात्र, या शिताफीने केलेल्या चोरीचा सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने छडा लावत रेकॉर्डवरील महिला आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


गीतादेवी ऊर्फ मीनादेवी रामनरेश थोर (वय ५७, रा. इटावा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील रहिवासी गोविंद व्यंकटेश कुमार हे १५ सप्टेंबर २०२६ रोजी कोपरगाव ते मंत्रालय असा रेल्वे प्रवास करीत होते. यावेळी आरोपी महिलेने प्रवासादरम्यान दाम्पत्याशी ओळख वाढवली. विश्वास संपादन केल्यानंतर प्रसाद म्हणून गुंगीकारक औषध मिसळलेली चिक्की खाण्यास दिली. चिक्की खाल्ल्यानंतर दोघांनाही गुंगी आली. हीच संधी साधत आरोपी महिलेने त्यांच्या जवळील तब्बल ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला.


या घटनेनंतर गोविंद कुमार यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि विविध ठिकाणी केलेल्या तपासाच्या आधारे संशयित महिलेचा माग काढण्यात आला. अखेर छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.





अनेक रेल्वे पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल!


तपासादरम्यान आरोपी महिलेविरुद्ध छत्रपती संभाजीनगर, कल्याण लोहमार्ग, दादर लोहमार्ग आणि मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही महिला रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करणारी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


१६ नोव्हेंबर रोजी सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी काही बाबींचा उलगडा होण्याची शक्यता असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी करीत आहेत.


या संपूर्ण कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक महेश भावी कट्टी यांनी दिली.


लोहमार्ग पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक!


रेल्वे प्रवासात घडलेल्या या गंभीर चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढून आरोपी महिलेला अटक करण्यात सोलापूर लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, पोलिसांच्या तपासातील तत्परतेचे कौतुक होत आहे.


प्रवाशांनो, सावधान.!

रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेले प्रसाद, चिक्की, खाद्यपदार्थ किंवा पेये स्वीकारणे धोकादायक ठरू शकते. केवळ काही क्षणांच्या विश्वासामुळे आयुष्यभराची कमाई गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींकडून कोणतेही खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत, आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी.




No comments:

Post a Comment