Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, November 21, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



लोणावळ्यात मोठी कारवाई.!

 ४ मोठ्या हॉटेल्सवर FDA ची धडक, परवाने निलंबित

मुदतबाह्य खाद्यपदार्थ, झुरळांचा वावर, अस्वच्छता


सारा न्यूज नेटवर्क | लोणावळा


पुणे - लोणावळा परिसरातील नामांकित हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अचानक तपासणीत उघड झाले आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा वापर, स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि झुरळांचा वावर आढळल्याने प्रशासनाने ४ मोठ्या हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.


परवाने निलंबित झालेली ४ हॉटेल्स :

1. दि ऑर्किड हॉटेल 2. दि फर्न हॉटेल 3. बेसिलिका हॉटेल 4. रिदम हॉटेल, तुंगार्ली 

'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत बुधवारी (दि. १८) ही तपासणी करण्यात आली. या कारवाईत वरील चारही हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.


तपासणीत काय आढळले ?

• एका हॉटेलच्या स्वयंपाकघरात तीन, तर कोल्ड स्टोरेजमध्ये आठ अशी एकूण ११ मुदतबाह्य दूधाची पाकिटे आढळली • अन्नपदार्थांची फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि फर्स्ट एक्सपायर्ड फर्स्ट आउट पद्धतीचे पालन केले जात नव्हते • कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवलेले होते • फ्रीज, चॉपिंग बोर्ड आणि शेगडीमागील भाग अस्वच्छ होता • स्वयंपाकघरात पाणी साचलेले असूनही कचरापेट्या उघड्या होत्या • कर्मचाऱ्यांकडून संरक्षक कपड्यांचा वापर केला जात नव्हता 

रिदम हॉटेलमध्ये झुरळांचा वावर


तुंगार्ली येथील रिदम हॉटेलच्या मुख्य स्वयंपाकघर आणि बेकरी विभागातील फ्रीजजवळ झुरळांचा वावर आढळला. पेस्ट कंट्रोलचे रेकॉर्डही सादर करण्यात आले नव्हते.


तसेच शाकाहारी - मांसाहारी तसेच कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्रपणे ठेवले जात नव्हते. फ्रीजमधील पदार्थ आणि सॉसच्या बाटल्यांवर लेबल नव्हते. बेकरी यंत्रसामग्री व फ्रीजची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचेही आढळले. अन्न पॅकेजिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्र आणि कर्मचाऱ्यांच्या FoSTaC प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती.


नियमांची पूर्तता केल्याशिवाय ही हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




No comments:

Post a Comment