सारा न्यूज नेटवर्क -
पुणे (प्रतिनिधी):- गेल्या १० वर्षांपासून नांदेड सिटीत रहात असताना सोसायटीचा स्टिकर गाडीवर नसल्याने नांदेड सिटी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी रहिवाशाला थांबून ठेवले. त्यांची पत्नी रहिवासी कार्ड घेऊन येईपर्यंत ८ ते १० सुरक्षा रक्षकाने घोळका करुन रहिवाशाला मारहाण केली. त्यांची पत्नी व मुलगा आल्यावर त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार नांदेड सिटी टाऊन शिपच्या मधुवंती सोसायटी मेनगेटवर मंगळवारी ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला. याबाबत प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे (वय ४२, रा. मधुवंती सोसायटी, नांदेडसिटी टाऊनशिप, नांदेड गाव) यांनी नांदेड सिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नांदेड सिटी टाऊनशिपचे सिक्युरिटी नेवरकर व आश्विनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गेल्या १० वर्षांपासून राहण्यास आहेत. फिर्यादी यांच्या पतीचा पुण्यात रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. नांदेडसिटीच्या सिक्युरिटी गार्डनी सोसायटीचे स्टिकर नसलेल्या गाड्या थांबवून ठेवल्या होत्या. त्यांचे पती प्रफुल्ल सोनकवडे यांनी पत्नीला फोन करुन सांगितले की, गेटवरुन सिक्युरिटी गार्ड कोणालाच स्टिकर असल्याशिवाय आत सोडत नाही. त्यामुळे सोसायटीत राहणारे लोकांशी खूप वाद चालू आहेत, असे सांगून त्यांनी सोसायटीचे रेसिडेन्सी कार्ड घेऊन येण्यास सांगितले. त्या आपला मुलगा ओमकार (वय २२) याला घेऊन गेटवर आल्या. तेथे नेवरकर व आश्विनी हे वाद घालून अरेरावीची भाष करुन अंगावर धावून जात होते. तेव्हा फिर्यादी व त्यांचा मुलगा त्याचे वाद सोडविण्यासाठी गेले असता नेवरकर याने फिर्यादी यांना धक्काबुक्की करुन हाताने मारहाण केली. तेव्हा त्यांचा मुलगा फिर्यादींना वाचविण्यासाठी आला असताना तेथे असलेल्या ८ ते १० सुरक्षा रक्षकांनी फिर्यादी व ओमकार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या पतीस नेवरकर व आश्विनी यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. या मारामारीत त्यांचा मुलगा ओमकार याच्या डोक्याला, तोंडास व इतर ठिकाणी मार लागला. ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारें
No comments:
Post a Comment