Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, April 29, 2025

महावितरणच्या धोरणांविरोधात अभियंत्याचे "लेखणी बंद" आंदोलन..


 सारा न्यूज नेटवर्क - 

महावितरणच्या धोरणांविरोधात अभियंत्याचे "लेखणी बंद" आंदोलन..

  सोलापूरसह राज्यभरात ग्राहकांवर पडला प्रभाव..

 सोलापूर (प्रतिनिधी) :- बदली धोरण, कर्मचाऱ्यांची पुनर्रचना, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सेटअप्संदर्भात अभियंत्यांच्या संघटनेला विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याने सबऑर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले असून, शुक्रवारपासून 'लेखणी बंद' आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

महावितरण मधील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातील धोरणाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार एकतर्फी बदलीसत्र सुरू आहे. त्याला सबऑर्डिनेट इंजिनियर संघटनेचा विरोध आहे. महानिर्मिती कंपनीनेही बदली धोरणानुसार एकतर्फी बदल्या सुरू केल्या आहेत. त्याला विरोध करीत संघटनेने वर्ग-२ आणि ३ च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बदलीचे निकष पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी केली आहे. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या पुनर्रचनेसंदर्भात संघटनेने कंपनीकडे प्रस्ताव दिलेला आहे.


त्यानुसार शाखा कार्यालय, उपकेंद्रे आणि नवीन केंद्र तयार झाल्यानंतरच ही पुनर्रचना लागू करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. थेट सेवा भरतीमध्ये एकरुपता असणे गरजेचे आहे. त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, निवड

प्रक्रियासाठी त्यामध्ये बदल करण्यासाठीचा प्रस्ताव होल्डिंग कंपनीकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र त्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. या मुद्याकडे सरकार आणि व्यवस्थानाचे लक्ष वेधण्यासाठी सबऑर्डिनेट इंजिनिअर संघटेनेने चार टप्प्यात आंदोलन केले. द्वारसभा, प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, अतिरिक्त पदभार सोडणे, आत्मक्लेश आंदोलन, सर्व कार्यालयीन मोबाईल कॉल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन क्रमांकावर वळविणे, सीमकार्ड जमा करणे आदी प्रकारचे हे आंदोलने झाल्यानंतरही सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने लेखणी आणि संगणक वापर बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प आणि ग्राहक सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment