सारा न्यूज नेटवर्क -
अवैध हॉटेल, चायनीज सेंटर, व ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई;
सात लाख ३१ हजारांचा दंड वसूल केला. २ वाहने जप्त, २२ गुन्हे दाखल...
सोलापूर(प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील अवैध हॉटेल,ढाबे तसेच चायनीज सेंटरवर कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सात लाख ३१ हजारांचा दंड वसूल केला.नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्य उत्पादन विभागाकडून शहर परिसर तसेच जिल्ह्यात कारवाईचा धडाका लावला होता. यामध्ये अवैध हॉटेल तसेच ढाब्यांवर लक्ष केंद्रित केले होते. या काळात २२ गुन्हे दाखल करून दोन वाहनांसह नऊ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान, अवैधरीत्या मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या ढाबे तसेच हॉटेल या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये होटगी रोडवरील मातोश्री, दुर्गा ढाबा येथे कारवाई केली. तसेच मंगळवेढा रोडवरील जय भवानी ढाब्यावरही कारवाई झाली. पंढरपूर कासेगाव रस्त्यावरील साई राजे व महाराज ढाब्यावर कारवाई करण्यात आली.मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील शिवनेरी व सांगोला येथील शुभम ढाब्यावर कारवाई करण्यात आली. तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल अपूर्वा, उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथील हॉटेल सावली अशा शहर व जिल्ह्यातील २५ ठिकाणी कारवाई करण्यात आली.दरम्यान, वैद्यकीय चाचणीनंतर २५ ढाबामालक व ६१ मद्यपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ढाबा चालकांना प्रत्येकी तीस हजार व मद्यपींना प्रत्येकी तीन हजार असा दंड न्यायालयाने ठोठावला. राज्य उत्पादनकडून करण्यात आलेल्या एकूण कारवाईत सात लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. शहर जिल्ह्यात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादनकडून सांगण्यात आले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment