सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रूप मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ..
चोरांच्या दहशतीने गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे...
सोलापूर (प्रतिनिधी):- शहरालगतच्या मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) गावामध्ये मागील दीड महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ८ चोरटे चित्रीत झाले आहेत. पण, अद्याप पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गावातील युवकांसह, ज्येष्ठ नागरीक रात्रभर गस्त घालत आहेत. पण, पोलिसांचे गस्त पथकं केवळ कागदावरच आहे. क्वचितप्रसंगी मध्यरात्री गावातील मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगात गस्त पथकाची गाडी जाते. पण, चोरांच्या दहशतीने गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याची तसदी मंद्रूप पोलिस घेत नाहीत. सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह, फौजदार, बीट अंमलदार विविध घटकातील लोकांचे सत्कार सोहळे, वाढदिवस अन् कौतुक सोहळ्यास मश्गूल आहेत. २८ डिसेंबरला गावातील चार ते पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. त्यानंतर वाड्या वस्त्यांवर चोरट्यांचा वावर सुरुच आहे. पंधरा दिवसांपूर्वी गावातील नवले गल्लीतील एक बंद घरामध्ये दोन संशयित व्यक्ती बसले होेते. त्या भागातील लोकांनी त्या बंद घराच्या बाहेर पहारे देत पोलिसांना बोलाविले. पण, ते आले नाही. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत संशयित पसार झाले. त्यानंतर वीरभद्र मंदिर परिसरात मध्यरात्री पोलिस मित्र प्रकाश जकुणे याने एका संशयीतास पकडले. पण, त्याच दरम्यान संशयीताच्या दुसऱ्या साथीदाराने पोलिस मित्राला मारहाण करीत अंधारात पळून गेले होते. वेगवेगळ्या भागामध्ये चोरीचे प्रकार सुरुच असून मंद्रूप पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment