Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, August 23, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



भंडारकवठेत रंगला डी.एम. चषक कबड्डीचा थरार

मुंबई उपनगरच्या संघाने पटकावले अजिंक्यपद सोलापूरच्या श्रीराम स्पोर्ट्स क्लबला उपविजेतेपद 


प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर 


भंडारकवठे येथे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेश पाटील मित्र परिवाराने आयोजित केलेल्या डी.एम. चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत अजिंक्यपद पटकावले.


 सोलापूरच्या श्रीराम स्पोर्ट्स क्लबने उत्कृष्ट झुंज दिली, मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर सांगोल्याच्या कडलास स्पोर्ट्स क्लबने तृतीय क्रमांक मिळविला.


भंडारकवठे येथे प्रथमच भरविण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुणे, सांगोला, धाराशिव, अथणी, जत आणि सोलापूर परिसरातील ३३ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी भंडारकवठेत कबड्डीचा जल्लोष पाहायला मिळाला.


या स्पर्धेतील अंतिम सामना मुंबई उपनगर विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब सोलापूर यांच्यात रंगला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि चुरशीचा खेळ करत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. प्रत्येक गुणासाठी खेळाडूंनी जीवाची बाजी लावल्याने सामन्यात क्षणाक्षणाला रंगत वाढत गेली. अखेर मुंबई उपनगर संघाने निर्णायक क्षणी सरस कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर श्रीराम स्पोर्ट्स क्लब सोलापूर संघाने शानदार खेळ करत उपविजेतेपद मिळविले.



या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रथमेश पाटील मित्र परिवाराने घेलेल्या सामाजिक व क्रीडा स्पर्धा उपक्रमांचे कौतुक केले. तसेच भंडारकवठे ग्रामस्थांच्या सुख-दुःखात आणि गावाच्या विकासाच्या वाटचालीत खंबीरपणे साथ देऊ असे आश्वासन दिले.


यावेळी माजी पंचायत समिती सदस्य एम. डी. कमळे, वसंतराव पाटील, विठ्ठल पाटील, तेलगावचे श्रीशैल पाटील, चिदानंद कोटगोंडे, निंबण्णा जंगलगी, निंगप्पा कुबसंगे, माजी सरपंच सोमशंकर पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.



या स्पर्धेतील सामने निष्पक्ष आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पंच म्हणून बळीराम कांबळे, प्रमोद कांबळे, संतोष बगले आणि सोमा जंगलगी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

क्रीडा, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकासाचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या डी.एम. चषक कबड्डी स्पर्धेमुळे भंडारकवठेत क्रीडामय वातावरण निर्माण झाले. युवकांच्या क्रीडागुणांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




No comments:

Post a Comment