Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, August 22, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 सांगलीच्या‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत नोंद.. 

ICAR-NBAGR कडून ॲक्सेशन नंबर प्रदान;

मेंढीपालकांसाठी ऐतिहासिक क्षण.. 


सांगली (प्रतिनिधी) :- सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उगम पावलेल्या आणि धिप्पाड शरीरयष्टी,जलद वजनवाढ व प्रतिकूल हवामानात तग धरण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो (NBAGR),कर्नाल यांच्याकडून ही मान्यता देण्यात आली असून, माडग्याळ मेंढीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ICAR च्या १४व्या ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या बैठकीत माडग्याळ मेंढीच्या स्वतंत्र जातीच्या नोंदणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.यासंदर्भातील अधिकृत पत्र ICAR-NBAGR चे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्तांना पाठविले आहे.


 *माडग्याळ हेच नाव का* 

जत तालुक्यातील माडग्याळ या गावातील बाजारामध्ये ही मेंढी सर्वप्रथम आढळली त्यामुळे या प्रजातीचे नाव माडगळ हे ठेवण्यात आले आहे

जत तालुक्यातील सिद्धनाथ खोरे,माडग्याळ परिसरासह आटपाडी,कवठेमहांकाळ व लगतच्या भागात माडग्याळ मेंढीचे पारंपरिक पद्धतीने संगोपन केले जाते.राष्ट्रीय स्तरावरील या मान्यतेमुळे मेंढीपालन व्यवसायाला नवी दिशा मिळण्यासह या जातीच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक पद्धतीने प्रयत्न करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


 *तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश* 


माडग्याळ मेंढीला स्वतंत्र जात म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा सुरू होता.या दीर्घ प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने सांगली जिल्ह्यासह माडग्याळ मेंढीचे संगोपन करणाऱ्या मेंढपाळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता मिळाल्यामुळे मेंढीपालन व्यवसायाला मोठी उभारी मिळेल आणि या व्यवसायासाठी अधिक शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त केला.


 *माडग्याळ मेंढीची खास वैशिष्ट्ये* 


माडग्याळ मेंढीची लांब व उंच शरीरयष्टी,वैशिष्ट्यपूर्ण बाकदार नाक (रोमन नोज), लांब कान आणि जलद वजन वाढण्याची क्षमता ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.कमी पाण्यात तसेच प्रतिकूल हवामानातही टिकून राहण्याची तिची क्षमता असल्याने दुष्काळी व कमी पर्जन्यमानाच्या भागातील मेंढपाळांसाठी ही जात विशेष महत्त्वाची मानली जाते.


 *राष्ट्रीय मान्यतेमुळे काय बदलणार?* 


अनुवंशिक संवर्धनाला चालना,स्वतंत्र ॲक्सेशन नंबर मिळाल्यामुळे माडग्याळ मेंढीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व नोंदणी शक्य होणार आहे.मूळ जातीची शुद्धता टिकवण्यासाठीही मदत होईल.


 *शासकीय योजना व निधीचा मार्ग मोकळा* 


माडग्याळ मेंढीच्या पैदास, संशोधन,संवर्धन आणि मेंढपाळांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व निधी उपलब्ध होण्यास चालना मिळू शकते.


मेंढपाळांच्या उत्पन्नात वाढीची शक्यता राहील राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र जात म्हणून ओळख मिळाल्यामुळे माडग्याळ मेंढी व बोकडांना अधिकृत ओळख आणि बाजारमूल्य मिळण्यास मदत होणार असून,त्याचा थेट फायदा मेंढपाळांना होण्याची अपेक्षा आहे.


 *शुद्ध पैदास केंद्र व सिमेन बँकेला गती* 


माडग्याळ मेंढीचे शुद्ध पैदास केंद्र तसेच कृत्रिम रेतनासाठी सिमेन बँक उभारण्याच्या प्रयत्नांना या मान्यतेमुळे अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.



 *ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी* 

:माडग्याळ मेंढीपालन हा सांगलीसह परिसरातील अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. राष्ट्रीय मान्यतेमुळे या पारंपरिक व्यवसायाला नवी बाजारपेठ,वैज्ञानिक आधार आणि आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


 *मेंढपाळ समाजासाठी ऐतिहासिक अभिमानाचा क्षण* 


माडग्याळ मेंढीला मिळालेली राष्ट्रीय मान्यता ही केवळ एका मेंढीच्या जातीची नोंद नसून पिढ्यान्‌पिढ्या तिचे संगोपन करणाऱ्या मेंढपाळांच्या पारंपरिक ज्ञान, कष्ट आणि योगदानाची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल आहे.या निर्णयामुळे सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि मेंढीपालन व्यवसायाला नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तेव्हा या माडग्याळमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक वेगळी ओळख आणि नवीन उत्क्रांती मेंढी पालन व्यवसायात होईल असा तज्ञांच्या मते आहेत आणि विश्वास सर्वच क्षेत्रातून व्यक्त होताना दिसत आहे.




No comments:

Post a Comment