Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, October 27, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेत कामशेतच्या यश ज्ञानदेव कदम यांचा डंका.!

द्वितीय क्रमांक पटकावत ७५ हजारांचे रोख पारितोषिक; आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते गौरव..


कामशेत, मावळ :- महाराष्ट्रातील सर्वात मोठी रील स्पर्धा म्हणून चर्चेत आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड मानवंदना सोहळा २०२६ मध्ये कामशेत, ता. मावळ येथील यश ज्ञानदेव कदम यांनी द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल त्यांना आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते सन्मानपत्र, भेटवस्तू आणि ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


आमदार महेशदादा लांडगे यांच्या आयोजनातून पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना १२८ मीटर लांबीच्या भगव्या ध्वजाद्वारे मानवंदना अर्पण करण्यात आली. ढोल-ताशांच्या भव्य गजराने संपूर्ण परिसर शिवमय झाला. या सोहळ्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.


हिंदू भूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने आयोजित रील स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत यश ज्ञानदेव कदम यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर द्वितीय क्रमांक मिळवत कामशेतसह मावळ तालुक्याचा गौरव वाढवला.


या सोहळ्यात स्पर्धकांचे कौतुक करताना आमदार महेशदादा लांडगे यांनी, “हे रील स्टार नसून रिअल स्टार आहेत. वास्तवता आणि सत्य दाखवण्याचे काम ते करत आहेत,” अशा शब्दांत रीलनिर्मात्यांच्या कार्याचे कौतुक केले.


“तुम्ही केवळ रील बनवल्या नाहीत, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा अभिमान घराघरात पोहोचवला. छत्रपतींच्या पराक्रमाची, शौर्याची आणि स्वाभिमानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य तुम्ही केले आहे. म्हणूनच तुम्ही केवळ रील स्टार नसून खऱ्या अर्थाने रिअल स्टार आहात!” या भावनेतून या स्पर्धेचे आणि सहभागी तरुणांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित होते.


यश यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि कलेप्रती असलेली आवड महत्त्वाची ठरली. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कामशेत परिसरात आनंदाचे वातावरण आहे.


या भव्य सोहळ्याचे आयोजन करून तरुणांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार महेशदादा लांडगे आणि हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट यांचे यश यांचे वडील ज्ञानदेव काशिनाथ कदम यांनी आभार मानले.


कामशेतच्या यश ज्ञानदेव कदम यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




No comments:

Post a Comment