सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रूप ग्रामपंचायतीला ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत ५० लाखांचा निधी मंजूर; नांदणी रोडवर वृक्षारोपण आणि ५८० एलईडी दिवे लागणार
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. 'माझी वसुंधरा अभियान ४.०' मध्ये १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गावाला ५० लाख २ हजार ३५१ रुपयांचे बक्षीस मिळाले आहे .
या बक्षीस रकमेच्या विकास आराखड्याला आता राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय ४ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीतून गावात खालील प्रमुख कामे केली जाणार आहेत:
नांदणी रोड सुशोभीकरण (निधी: ₹२५,००,९१९): नांदणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गणपती मंदिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाईल.
गावात प्रकाशयोजना (निधी: ₹२०,८८,९३२): ग्रामपंचायतीच्या जुन्या पथदिव्यांच्या खांबांवर ५८० नवीन एलईडी (LED) स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार आहेत.
इतर तरतूद: उर्वरित निधी आयइसी (IEC), पीएमसी (PMC) आणि तांत्रिक मंजुरी शुल्कासाठी वापरला जाईल.
*सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे बंधन*
या विकासकामांची अंमलबजावणी थेट मंद्रूप ग्रामपंचायत करणार आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यापासून पुढील सहा महिन्यांच्या आत ही सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच कामाच्या प्रगतीचा आर्थिक व भौतिक अहवाल दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत शासनाला सादर करावा लागणार आहे.
या बक्षीस रकमेतील २५ लाख रुपये आधीच वितरित झाले असून, उर्वरित २५ लाखांचा दुसरा हप्ता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लवकरच मिळणार आहे.
"गावाचा विकास हाच आमचा केंद्रबिंदू आहे.
माझी वसुंधरा अभियानात मंद्रूपने मिळवलेल्या या यशामुळे गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि आधुनिक एलईडी लाईट्स बसवणे शक्य होणार आहे, ज्यामुळे गावाचे रूप बदलेल "
अनिता कोरे,सरपंच,मंद्रूप ग्रामपंचायत


No comments:
Post a Comment