सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जाऊन आढावा
बोरामणी येथे पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची, पाणी व चारा टंचाईची माहिती घेतली
सोलापूर : - पावसातील खंड तसेच कमी पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे.
बोरामणी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात बोरामणीसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांना भेटी देऊन प्रशासनाने परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चाऱ्याची परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः शेतात जाऊन सोयाबीन, ऊस आणि मका या पिकांची पाहणी केली. पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांवर झालेला परिणाम, जमिनीतील ओलाव्याची स्थिती आणि आगामी काळातील संभाव्य अडचणींबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांच्या अडचणींची वस्तुनिष्ठ माहिती शासनापर्यंत पोहोचवून, शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रत्यक्ष शेतपातळीवरील परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाच्या मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पाहणीप्रसंगी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तहसीलदार विनायक नगर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरूळे यांच्यासह महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तसेच कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, दक्षिण सोलापूर सभापती संदीप टेळे, उपसभापती सौ. वर्षा पटणे, अक्कलकोट पंचायत समिती सभापती सौ. रश्मी हिप्परगी, विकास बुळ्ळा, सिद्धाराम शिवमूर्ती, आप्पासाहेब किवडे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment