Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, September 11, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



दोन गटांतील तुंबळ हाणामारीप्रकरणी आरोपी जेरबंद; चारचाकी वाहने जप्त.

वळसंग पोलिसांची कारवाई..

वळसंग, (प्रतिनिधी ) दि. 10 सप्टेंबर 2026 :


वळसंग गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी वळसंग पोलिसांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत गंभीर गुन्ह्यातील ५ आरोपींना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी ६ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.


दि. 09 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 16.30 वाजण्याच्या सुमारास वळसंग येथे पूर्ववैमनस्याच्या कारणावरून दोन गटांतील जमाव जमला. यावेळी लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप व कोयत्यांचा वापर करून एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत काही जण जखमी झाले असून, सदर घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गु.र.नं. 556/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 118(1), 118(2), 115(2), 189(2), 190, 191(2), 191(3), 351(2), 351(3), 352, 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील ५ आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.



तसेच दुसऱ्या गटाकडून प्राप्त तक्रारीवरून गु.र.नं. 557/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे सुरू आहे.


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र टाकणे तसेच प्रभारी अधिकारी सपोनि राहुल डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. तसेच फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठाणे स्तरावर तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.


पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात असून वळसंग गावात सध्या शांतता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.


सदर उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि राहुल डोंगरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी, पोहेकॉ सुरवसे, पोना बंदीछोडे, पोह माळी, पोहेकॉ पाटील, पोना चव्हाण, पोका मांढरे व पोका कुंभार यांनी केली आहे.


वळसंग पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवून गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश आले आहे.




No comments:

Post a Comment