सारा न्यूज नेटवर्क -
विद्यार्थ्यांनी हातांनी साकारला ‘हरित गणेश’.!
हजारो विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती;
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा विद्यार्थ्यांसोबत सहभाग
सोलापूर : - गणेशोत्सवात भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सोलापूर महानगरपालिका, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शिल्पकार आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारत ‘हरित गणेशोत्सवा’चा संदेश दिला. शिल्पकारांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी माती मळण्यापासून ते गणेशमूर्तीला आकार देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली. विविध आकार, आकर्षक कलाकुसर आणि कल्पकतेने तयार केलेल्या गणेशमूर्तींमुळे कार्यशाळेचे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत गणेशमूर्ती निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींची पाहणी करून त्यांनी त्यांच्या कल्पकतेचे आणि पर्यावरणाविषयीच्या जाणीवेचे कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या, “गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव आहे. मात्र उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून समाजासमोर सुंदर आदर्श ठेवला आहे. यंदा प्रत्येक कुटुंबाने शाडू मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून भक्तीबरोबरच पर्यावरणाचीही जपणूक करावी.”
शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या वापरामुळे गणेश विसर्जनानंतर होणारे जलप्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महापौर श्री. विनायक कोंडयाल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम, उद्यान व मंडई समितीचे सभापती राजशेखर पाटील, विधी व न्याय समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे, गणेश विविध संस्थेचे विकास गोसावी, शिल्पकार माने-जाधव, वृक्ष विनायक संस्थेच्या मधुरा विभुते, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
‘भक्तीही... पर्यावरणाची जपणूकही!’ हजारो चिमुकल्या हातांनी साकारलेल्या मातीच्या गणेशमूर्तींमधून यंदाच्या गणेशोत्सवासाठी हा सकारात्मक संदेश सोलापूरकरांपर्यंत पोहोचला आहे.



No comments:
Post a Comment