सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज;
सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी काळ्या फिती लावून आपले दैनंदिन कामकाज पार पाडले.
राज्यातील दुय्यम न्यायालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी मा. उच्च न्यायालयाने शासनास दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी अहवाल पाठविला होता. मात्र आजतागायत राज्य शासनाने या प्रस्तावावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे राज्यातील चारही न्यायालयीन कर्मचारी महासंघाने (महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट 'क', महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी लघुलेखक महासंघ, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ) राज्य शासनास दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी रितसर आंदोलनाची नोटीस दिली आहे.
आंदोलनाची पुढील दिशा अशी ठरविण्यात आली आहे -
अ. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयातील कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करतील.
ब. दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ या दोन दिवशी पुन्हा काळ्या फिती लावून कामकाज.
क. दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी एक दिवसाचा सामूहिक रजेवर जाणार.
ड. दि. ६ आणि ७ नोव्हेंबर २०२६ रोजी अन्नत्याग करून शांततेत आंदोलन.
इ. दि. १७ नोव्हेंबर २०२६ पासून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास राज्यातील समस्त न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
आजचा पहिला टप्पा सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या अधिपत्याखालील शहर आणि सर्व तालुका न्यायालयात यशस्वीरित्या पार पडला.
राज्य शासनाने समान-काम समान-वेतन या न्याय तत्वाने लवकरात लवकर सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होऊन १७ नोव्हेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. शाम राजेपांढरे, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष श्री. शकिल शेख, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश सोलनकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुकृत कुलकर्णी, प्रबंधक श्री. संजय म्याकलवार, श्री. संदिप वनकळसे, श्री. उमेश कुलकर्णी, श्री. माऊली डांगे, श्री. निलेश खमितकर, श्री. मेघराज लाळसंगी, श्री. जगन्नाथ भास्कर, श्री. प्रदिप जमदाडे, श्री. सचिदानंद निंबाळकर, श्री. विजय माळवदकर, श्रीमती. हेमा मठपती, श्रीमती. रुपाली चव्हाण, श्रीमती. प्रियंका जाधव, श्रीमती. रूबीना मुकेरी, श्रीमती. नडगेरी तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment