Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, September 7, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



🌿 श्रावण सोमवारी बेलवृक्ष लागवडीतून निसर्गदेवतेला प्रणाम

इको नेचर क्लबच्या पुढाकारातून ११ ठिकाणी बेलवृक्षांची लागवड; रोपांचेही वाटप.. 


सोलापूर : - श्रावण सोमवारचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत इको नेचर क्लबच्या माध्यमातून अशोक नगर परिसरात बेलवृक्षांची लागवड करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहासमोरील परिसरात औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी विकसित केलेल्या जागेत बेलवृक्षांचे रोपण करून निसर्गदेवतेला अनोख्या पद्धतीने प्रणाम करण्यात आला.


इको नेचर क्लबच्या माध्यमातून या परिसरात विविध प्रकारच्या देशी वृक्षांसह औषधी व वनौषधींची लागवड करून बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करताना निसर्गाची हानी होऊ नये आणि निसर्गाच्या सान्निध्यात वृक्षसंपदा वाढावी, यासाठी क्लबच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.



श्रावण महिन्यात अनेक महिला भगिनी भक्तिभावाने बेलाची पाने महादेवाला अर्पण करतात. मात्र, यंदा केवळ बेलाची पाने तोडून अर्पण करण्याऐवजी बेलाचे रोप लावून त्याचे संवर्धन करणे, हाच निसर्गाला खरा जपण्यासाठी प्रयत्न असेल. याच उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील विविध ११ ठिकाणी बेलवृक्षांची लागवड करण्यात आली तसेच नागरिकांना बेलाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.


‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि निसर्गाचे संवर्धन करा’ हा संदेश देत वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या नियमित संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारीही इको नेचर क्लबच्या माध्यमातून जोपासली जात आहे.


यावेळी इको नेचर क्लबच्या उमा दिगीनाल, रेल्वे विभागाचे अधिकारी श्रीपती दिगीनाल, अतुल फसाले, इको नेचर क्लबच्या सदस्या मेघा कांबळे, गीताश्री कोकाटे, प्रतिभा देवकर तसेच पर्यावरणदूत व इको नेचर क्लबचे संस्थापक डॉ. मनोज देवकर आदी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत बेलवृक्षांची लागवड करण्यात आली.


श्रावणातील भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत—

बेलाचे पान अर्पण करा; पण त्याचबरोबर बेलाचे झाडही लावा!’

हा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




No comments:

Post a Comment