सारा न्यूज नेटवर्क -
वन शहीद दिनानिमित्त औषधी वनस्पती वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
सोलापूर, दि. ११ सप्टेंबर २०२६ -
पुण्यश्लोक अहिल्याबाई प्रसूतीगृह व सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन शहीद दिन व अमृता देवी बिश्नोई यांच्या स्मृती दिनानिमित्त औषधी वनस्पती वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ११.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई प्रसूतीगृहाच्या परिसरात या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
३६३ बिश्नोईंचे बलिदान प्रेरणादायी
या वेळी अमृता देवी बिश्नोई यांच्या ऐतिहासिक बलिदानाचे स्मरण करण्यात आले. इ.स. १७३० मध्ये राजस्थानातील खेजडली गावात राजदरबाराच्या आदेशाने खेजडीची झाडे तोडण्यासाठी आलेल्या लोकांना अमृता देवी यांनी "झाड वाचवण्यासाठी आपले मस्तक देणेही झाड तोडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे" या भावनेतून झाडाला मिठी मारून विरोध केला होता. या संघर्षात त्यांच्यासह त्यांच्या तीन मुली आणि एकूण ३६३ बिश्नोई समाज बांधवांनी बलिदान दिले. हे बलिदान आजही वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
कार्यक्रमात खेजडी वृक्षासह विविध औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले. "वृक्ष म्हणजे जीवन; वृक्षांचे संरक्षण म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण" हा संदेश यावेळी देण्यात आला.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश
वन शहीदांच्या बलिदानातून प्रेरणा घेत एक तरी झाड लावावे, लावलेल्या झाडाची नियमित काळजी घ्यावी, वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी, पक्षी व वन्यजीवांचे संरक्षण करावे आणि स्वच्छ, हिरवे व निरोगी पर्यावरण निर्माण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. "झाड लावा - झाड जगवा - पर्यावरण वाचवा" हा नारा देण्यात आला.
प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, सोलापूर श्रीमती शुभांगी जावळे, वनपाल श्रीमती रेणुका सोनटक्के, कर्मचारी श्री. राजकुमार कोळी यांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संस्कृती वळसनकर, मेट्रण श्रीमती संगीता लेकुरवाळे, फार्मासिस्ट श्री प्रदीप वेदपाठक, श्रीमती सुनिता ढगे व प्रसूतीगृहातील सर्व मान्यवर स्टाफ आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्याबाई प्रसूतीगृह आणि सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांनी केले होते.





No comments:
Post a Comment