सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर विद्यापीठात 'जागतिक पालि भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा; विशेष व्याख्यानाचे आयोजन..!
सोलापूर (प्रतिनिधी) : महावीर रणखांबे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भाषा व वाङ्मय संकुलातील पालि विभागाच्या वतीने भंते अनागारिक धम्मपाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'जागतिक पालि भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाच्या अहिल्या भवन सभागृहात या निमित्ताने 'संशोधनाच्या दृष्टिकोनातून पालि भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व' या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. कर्नल प्रकाश महानवर हे होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक मा. अतुल भोसेकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना व्याख्याते अतुल भोसेकर यांनी पालि भाषेचे ऐतिहासिक महत्त्व आणि प्राचीन साहित्यातील तिचे योगदान अधोरेखित केले. आजच्या आधुनिक युगातही संशोधनाच्या दृष्टिकोनातून पालि भाषेचा अभ्यास करणे किती गरजेचे आहे, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांची लाभलेली विशेष उपस्थिती ठरली. देशसेवेतून निवृत्त झालेल्या या सैनिकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढवली.
कार्यक्रमाला प्र-कुलगुरू मा. प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक डॉ. महेश खरात, सहायक प्राध्यापक डॉ. उत्तम कांबळे आणि प्रा. विजय कुमार झुंबरे यांनी केले.
या व्याख्यानाला विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि पालि भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment