सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्ह्यात FDA चा सर्जिकल स्ट्राईक.!
दोन हजार किलो भेसळयुक्त मसाला जप्त, ७ दुकानांवर कारवाई..
राज्यात सुट्या मसाल्याच्या विक्रीवर १०० टक्के बंदी
सोलापूर (२८ ऑक्टोबर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेतली आहे. ३ दिवसात ७ आस्थापनांवर कारवाई करत संशयास्पद आणि भेसळयुक्त तब्बल १९५० किलो मसाला जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात सुट्या मसाल्याच्या विक्रीवर १०० टक्के बंदी घालण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार -
"सुट्या मसाल्यांमधील केमिकल भेसळ ही सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी थेट कर्करोगाला आमंत्रण देणारी ठरत आहे. सर्व हॉटेल्स, केटरर्स आणि किराणा दुकानांची अचानक फेरतपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ३ दिवसांत आम्ही १९५० किलो भेसळीच्या संशयावरून मसाले जप्त केले आहेत."
काय आहे धोका?
सुट्या हळदीला आकर्षक व गडद पिवळा रंग आणण्यासाठी बाजारात 'मेटॅनील यलो' नावाच्या प्रतिबंधित केमिकल डायचा प्रचंड वापर केला जातो. मेटॅनील यलो आणि विटांच्या चुऱ्यासारखे घातक पदार्थ शरीरात गेल्यामुळे जठर आणि आतड्यांच्या अस्तराचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते. यामुळे कर्करोगासह गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत.
'या' मसाल्यांवर आहे बंदी
या कायद्यांतर्गत हळद, मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिंग, केशर, गरम मसाला आणि सर्व प्रकारच्या मिश्र मसाल्यांच्या उघड्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यापुढे फक्त पॅकबंद, लेबल आणि परवाना असलेलाच मसाला विकता येणार आहे.
नागरिकांनी पॅकबंद आणि विश्वसनीय मसालाच खरेदी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments:
Post a Comment