Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, November 28, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 


मोबाईल पासून दूर, मातीशी जोडणारा उपक्रम : सोलापुरात 'वन डे फार्मर' अकॅडमीक एज्युकेशनल ट्रिप सुरू

एक दिवस शेतकरी बनून पाहूया, आयुष्यभर शेतकऱ्यांचा सन्मान करूया - डॉ. चित्तरंजन भोजने यांचे आवाहन


सोलापूर (प्रतिनिधी) : - मोबाईल आणि संगणकाच्या युगात अधिक वेळ घालवणाऱ्या मुलांना शेती आणि मातीशी जोडण्यासाठी 'वन डे फार्मर' अकॅडमीक एज्युकेशनल ट्रिप ही संकल्पना इंडियन रुरल हेल्थकेअर फाउंडेशन अंतर्गत डॉ. भोजने पब्लिक स्कूल यांच्या मार्फत सुरू करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. चित्तरंजन भोजने आणि संचालिका वेणू भोजने यांनी पत्रकार परिषदेत दिली.


सोलापूर शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी रोडवरील कारंबा परिसरातील स्नेहालयाच्या परिसरात हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.


विद्यार्थ्यांना येथे काय मिळेल?

शेतीची ओळख, बीज संवर्धन, रोपवाटिका, निसर्ग निरीक्षण, ग्रामीण जीवनशैली, पर्यावरण संवर्धन, अन्ननिर्मिती आणि शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन जवळून अनुभवता येणार आहे.

शिक्षणासोबत संस्कार आणि जीवनकौशल्याचा विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मोबाईलच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी एकाग्रता, अभ्यासातील लक्ष, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास यावर मेडिटेशन आणि ग्रामीण भागातील मैदानी खेळ यांचा यामध्ये समावेश असणार आहे.

ग्रामीण ढंगातील आजीबाईच्या गोष्टींच्या माध्यमातून जुन्या काळातील संस्कार, अनुभव आणि जीवनमूल्यांची ओळख करून दिली जाणार आहे.

सकाळी १० ते सायंकाळी ५ असा संपूर्ण दिवस प्रत्यक्ष अनुभवाचा असणार आहे. पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जावून प्रत्यक्ष निरीक्षण, कृती आणि अनुभव घेता येणार आहे.

शेतकरी हा समाजाचा अन्नदाता असून आपल्या अन्नामागे शेतकऱ्याचे किती कष्ट असतात याची जाणीव मुलांना करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

वन डे फार्मर ही केवळ एक दिवसाची सहल नसून विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवणारा जीवनानुभव ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील सर्वच प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षकांनी तसेच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वन डे फार्मरच्या सहलीसाठी नियोजन करावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आले.

आमचा मुख्य उद्देश आयुष्यभरासाठी शेतकऱ्यांप्रती आदराची भावना असली पाहिजे, या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थी एक महत्त्वाचा जीवनधडा शिकणार आहे. एक दिवस शेतकरी बनून पाहूया आणि आयुष्यभर शेतकऱ्यांचा सन्मान करूया, असं आवाहन डॉ. चित्तरंजन भोजने यांनी शेवटी केले.




No comments:

Post a Comment