Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, August 26, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



ओवाळणीच्या पैशांतून रस्त्यावरील खड्डे बुजविले...!

बहिणींच्या प्रेमाची ओवाळणी भावांच्या सुरक्षिततेसाठी; ‘एकत्व च्या युवकांचा अनोखा सामाजिक उपक्रम.. 


सोलापूर :- रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर एकमेकांच्या सुरक्षिततेची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस. याच भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी रक्षाबंधनाच्या ओवाळणीच्या पैशांचा उपयोग चक्क रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केला. बहिणींनी प्रेमाने दिलेली ओवाळणी भावांच्या सुरक्षित प्रवासासाठी खर्च करून या युवकांनी समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला.


बाळे परिसरातील सोलापूर-बार्शी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. अपघाताचा धोका लक्षात घेऊन ‘एकत्व’च्या सदस्यांनी पुढाकार घेत हा प्रश्न प्रशासनाकडे सोपवून न थांबता ‘आपल्या भावांच्या सुरक्षिततेसाठी आपणही काहीतरी करूया’, या भावनेतून प्रत्यक्ष काम करण्याचा निर्णय घेतला.


मागील वर्षी रक्षाबंधनाच्या वेळी सदस्यांच्या बहिणींनी ओवाळणीसाठी दिलेल्या रकमेतून एकत्रित २ हजार ४०० रुपये जमा करण्यात आले होते. हीच रक्कम सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून मुरूम, खडी, विटांचे तुकडे तसेच खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सदस्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बाळे हद्दीतील मोठमोठे खड्डे बुजविले.


बाळे परिसरात मोठी दुकाने, रुग्णालये आणि विविध व्यावसायिक आस्थापना असल्याने या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित प्रश्न आहे. अशा परिस्थितीत बहिणींनी दिलेल्या ओवाळणीच्या पैशातून भावांनी रस्त्यावरील खड्डे बुजविणे, हा रक्षाबंधनाच्या भावनेला सामाजिक जबाबदारीची जोड देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.


या उपक्रमात पिरप्पा कोळी, किरण सरवळे, ऋषिकेश हरसुरे, राजेश केकडे, शहाबाज मकानदार, दीपक करकी, राजेश वाघमोडे, विजय वैद्य, बिलाल नदाफ आदी सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.


🔲ओवाळणीला मिळाला समाजसेवेचा अर्थ...


रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. त्याच सुरक्षिततेसाठी ओवाळणीची रक्कम वापरली गेल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘प्रेमाची ओवाळणी केवळ खिशात न ठेवता समाजाच्या उपयोगी आणली तर त्यातून परिवर्तनाची सुरुवात होऊ शकते,’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


🔲“सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने बाळे-बार्शी महामार्गावर खड्ड्यांची समस्या गंभीर झाली होती. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. सदस्यांच्या बहिणींनी दिलेल्या ओवाळणीच्या पैशातून हे खड्डे बुजवून भावांच्या सुरक्षिततेसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरातील समस्या केवळ प्रशासनाकडे सोपवून न थांबता, शक्य असेल तेथे सामाजिक जबाबदारी म्हणून पुढाकार घ्यावा,*”

दीपक करकी, एकत्व सोशल फाउंडेशन, बाळे




No comments:

Post a Comment