सारा न्यूज नेटवर्क -
बोरामणी गटातील प्रश्न जि.प. सभेत गाजले — नेताजीभाऊ खंडागळेंची ठाम भूमिका
सोलापूर, 20 मे 2026 : — काल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेली सर्वसाधारण सभा बोरामणी गटाच्या प्रश्नांनी गाजली. जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे यांनी आपल्या गटातील महत्त्वाचे मुद्दे सभागृहासमोर मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले.
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान
खंडागळे यांनी सांगितले की, बोरामणी गटातील बहुतांश तांड्यांवरील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. शाळेच्या इमारती असूनही शिक्षक नसल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. त्यांनी या ठिकाणी तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी शेडची मागणी
संत गजानन महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर उळे येथे पहिला मुक्काम असतो. दरवर्षी हजारो वारकरी येथे विसावतात. या पार्श्वभूमीवर उळे येथे वारकऱ्यांच्या सोयीसाठी भव्य व कायमस्वरूपी शेड उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी नेताजीभाऊंनी केली.
व्यापार संकुलातून उत्पन्न वाढवा
जिल्हा परिषदेच्या आवारातील मोकळ्या जागेचा वापर करून तेथे व्यापार संकुल उभारल्यास जि.प.च्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक बळकटी मिळेल, असा विकासाभिमुख प्रस्तावही त्यांनी मांडला.
याशिवाय कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य आणि महावितरण विभागाशी संबंधित स्थानिक समस्या त्यांनी सभागृहात मांडल्या. सातत्याने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मांडणीची सभागृहात दखल घेण्यात आली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे
No comments:
Post a Comment