Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 30, 2026

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

निंबर्गीत लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून;

दळणाचे जाते (दगड) डोक्यात घालून भावाचे संपवले जीवन 


 दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) :- निंबर्गी येथे पंधरा दिवसाखाली कुऱ्हाडीने वार  करून जखमी केलेल्या मोठ्या भावाला लहान भावाने शनिवार पहाटे साडेचार वाजता झोपेत असताना जात्याच्या दगडाने डोके ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला. 

रेवणसिध्द उर्फ महांतेश सूर्यकांत ऐवळे (वय ४५) राहणार निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या खून प्रकरणी आरोपी लहान भाऊ संतोष सूर्यकांत ऐवळे (वय ३६) राहणार निंबर्गी याला मंद्रुप पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली. मंद्रुप पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी संतोष ऐवळे व त्याचा भाऊ मयत रेवणसिध्द या दोघांना दारूचे व्यसन होते. गेल्या १५ दिवसा खाली दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी रेवणसिध्द याने संतोष याला कुऱ्हाडीने मारुन जखमी केले होते. त्यामध्ये त्याच्या छातीला व पोटाला जखम झाल्याने टाक्या पडल्या होत्या. उपचारानंतर तो घरी आला होता.


शनिवारी रात्री नऊ वाजता पत्नी माहेरी गेल्यामुळे रेवणसिध्द याने भाजी केली. जेवण करीत असताना भाजी चांगली झाली नाही म्हणून आरोपी संतोष याने ती भाजी आईच्या अंगावर फेकली. यावरून पुन्हा दोन्ही भावांमध्ये वाद झाल्यामुळे .  आई वडील शेजारील मल्लिकार्जुन गेजगे यांच्या घरी झोपण्यास गेले. तर दोघे भाऊ घरासमोरच झोपले. पहाटे साडेचार वाजता झालेले भांडणाच्या रागात झोपलेल्या रेवणसिध्द याच्या डोक्यात जात्याचा दगडी पाटा घातला. डोके व तोंडावर जबर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ऐवळे कुटुंब राहत असलेल्या इंदिरानगर परिसरात खून झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.


या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, हवालदार शहानुर मुलाणी यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन  शवविच्छेदनासाठी मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तसेच खुनातील संशयित आरोपी संतोष ऐवळे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी  दिपाली ऐवळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास मंद्रुप पोलीस करीत आहेत.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment