सारा न्यूज नेटवर्क -
‘ती माझी पत्नी’ म्हणणाऱ्या आरोपीला न्यायालयाचा दणका;
“लग्न झालं म्हणून गुन्हा मिटत नाही” — बार्शी न्यायालयाचे स्पष्ट मत
बार्शी (सोलापूर) दि. 23 :- फिर्यादी तरुणीसोबत माझे कायदेशीर कोर्ट मॅरेज झाले आहे, त्यामुळे माझ्यावर दाखल गुन्हा सिद्ध होत नाही. असा दावा करणाऱ्या आरोपीला बार्शी न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. पीडितेवर अत्याचार सुरू झाले तेव्हा ती अल्पवयीन असल्याचा महत्त्वाचा मुद्दा न्यायालयाने अधोरेखित करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील एका तरुणीने मार्च 2026 मध्ये कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 2016 पासून आरोपी तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर त्याने पीडितेवर दबाव टाकत तिच्यासोबत संबंध ठेवले. पुढे शिक्षणासाठी पुण्यात गेलेल्या तरुणीला आरोपीने खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
या भीतीपोटी आरोपीने तरुणीला मुंबई, गुजरात आणि राजस्थान येथे नेले. त्यानंतर जबरदस्तीने ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चे दस्तऐवज तयार करून घेतले आणि पुढे धमकावत कोर्ट मॅरेज केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर कुर्डुवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा, बलात्कार तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दरम्यान, आरोपीने बार्शी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करत “पीडिता माझी कायदेशीर पत्नी आहे” असा दावा केला. मात्र, पीडित तरुणीच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून जामिनास तीव्र विरोध करण्यात आला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, 2016 मध्ये कथित अत्याचार सुरू झाले तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. त्यामुळे नंतर विवाह झाला असला तरी मूळ गुन्हा रद्द होत नाही. आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड . डी. डी. देशमुख यांनी बाजू मांडली, तर फिर्यादी तरुणीच्या वतीने अँड . जयदीप माने आणि अँड शरद झाल्टे यांनी काम पाहिले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे
No comments:
Post a Comment