सारा न्यूज नेटवर्क -
अभिनेते प्रविण तरडे यांची स्वामी भक्ती खरंच वाखाणण्याजोगी - नगरसेवक महेश इंगळे
अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.०७/०५/२६):- प्रविण तरडे स्वत अनेक मुलाखतीत सांगतात की सिनेसृष्टीत माझं करिअर स्वामींमुळेच घडलं. देऊळ बंद सिनेमाच्या आधी त्यांची परिस्थिती खूप बिकट होती. स्वामींवर सिनेमा करायचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांचं नशीबच पालटलं, म्हणून अभिनेते प्रविण तरडे यांची स्वामी भक्ती खरंच वाखाणण्याजोगी असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. आज वटवृक्ष मंदीरातील देऊळ बंद २ या मराठी चित्रपटाच्या टिझर अनावरण सोहळयाचे औचित्य साधून अभिनेते प्रविण तरडे व त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहल तरडे यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रविण तरडे व त्यांचे सुविद्य पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी प्रविण तरडे यांच्या गौरवा प्रित्यर्थ चेअरमन महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी अभिनेते प्रविण तरडे यांनी देऊळ बंद हा सिनेमा नवस फेडण्यासाठी केला. स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवले, म्हणून त्यांनी स्वामींची गोष्ट मोठ्या पडद्यावर आणली. प्रविण तरडे शूटिंगच्या आधी नेहमी येथे येऊन स्वामींचा आशीर्वाद घेतात, देऊळ बंद २ च्या मुहूर्तालाही संपूर्ण टीम येथे आली होती. पोस्टर रिलीजच्या आधी पण पोस्टर स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे.
मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव आदींसह त्यांच्या प्रत्येक सिनेमात कुठे ना कुठे श्री स्वामी समर्थांचा उल्लेख येतोच. त्यांची स्वामींवरील श्रद्धा लपून राहत नाही. प्रविण तरडे फक्त दिग्दर्शक नाहीत, ते स्वामींचे निस्सीम भक्त आहेत. सिनेमा हे त्यांच्यासाठी भक्तीचं माध्यम आहे.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश ते सिनेमातून घराघरात पोहोचवत आहेत ही खुप मौल्यवान सेवा आहे असेही मनोगत महेश इंगळे यांनी व्यक्त करुन अभिनेते प्रविण तरडे यांच्या पुढील वाटलचीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रशांत गुरव, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, प्रसाद सोनार, आदीसह भाविक भक्त उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment