सारा न्यूज नेटवर्क -
गरीब श्रीमंत भेदभाव न बाळगता स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात - जेष्ठ अभिनेते मोहन जोशी
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र देवून सत्कार केल्यानंतर अभिनेते मोहन जोशी यांचे मनोगत.
अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.०७/०५/२६) :-
विश्वव्यापी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे या पृथ्वीताला वरील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींकडे उच्च, नीच, गरीब, श्रीमंत, शुद्र, दिन, अनाथ असा भेदभाव नाही. प्रत्येक भक्तासाठी वटवृक्ष मंदीरातील त्यांच्या मुळ चरण पादूकांचे दर्शन म्हणजे स्वामींच्या दिव्य देहबोलीचे साक्ष देणारे आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक भाविकाला ते आपल्या अस्तित्वाची प्रचिती नक्कीच देतात, म्हणून स्वामी समर्थ महाराज हे गरीब श्रीमंत भेदभाव न बाळगता स्वामी भक्तांच्या हाकेला नेहमीच धावून येतात असे मनोगत तब्बल ६०० हून अधिक हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या भुमिकेला न्याय दिलेले जेष्ठ अभिनेते तथा देऊळ बंद व देऊळ बंद २ या भक्तीमय मराठी चित्रपटामधील श्री स्वामी समर्थ फेम कलाकार मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात दि.२१ मे रोजी प्रदर्शीत होणाऱ्या देऊळ बंद २ या मराठी चित्रपटाच्या टिझरचा अनावरण सोहळा मोठया भक्तीभावात संपन्न झाला. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती जोशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी अभिनेते मोहन जोशी बोलत होते.
पुढे बोलताना अभिनेते मोहन जोशी यांनी देऊळ बंद २ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा श्री स्वामी समर्थांचे पात्र साकारण्याबद्दल मोहन जोशी म्हणाले की स्वामींची भूमिका करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आहे. स्वामींचा आवाज डब करताना अंगावर काटा यायचा. वाटायचं की स्वामीच माझ्याकडून बोलून घेतायत.
पुन्हा एकदा स्वामी बनण्याची संधी मिळाली यासारखं दुसरं सुख नाही.
ही जबाबदारी आहे. पहिल्या भागापेक्षा या भागात स्वामींची कृपा अधिक खोलवर अनुभवायला मिळणार आहे.
पहिल्या भागात स्वामी परदेशातून आलेल्या नास्तिकाची परीक्षा घेतात. दुसऱ्या भागात आता परीक्षा देवाची आहे. भक्त संकटात आहे, रागात आहे, पण स्वामी त्याच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. हा संदेशच आजच्या काळात महत्त्वाचा आहे. मी मोहन जोशी नाही स्वामींचं माध्यम आहे. ही भूमिका नाही सेवा आहे. शूटिंग पुर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीम अक्कलकोटला आली आहे. थोडक्यात मोहन जोशी साठी ही भूमिका नाही, स्वामी सेवा आहे. माझा आवाज माझा अभिनय सगळं स्वामींचं आहे असे सांगताना यावेळी मोहन जोशी भावुक झाले होते. श्री.स्वामी समर्थ सर्व विश्वाचे कल्याण करतील असा विश्वास व्यक्त करून रसिक भाविकांनी आपल्या अभिनयाला दिलेली दाद म्हणजे मला मिळालेलं सर्वात मौल्यवान असा स्वामी प्रसाद असल्याचं मनोगतही जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी
यावेळी प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी,
अमर पाटील, रमेश शिंदे सर, मनोज जाधव, प्रसाद सोनार, प्रशांत गुरव, स्वप्निल गायकवाड, गिरीश पवार, रविराव महिंद्रकर, लखन सुरवसे, ओंकार महाडीक आदींसह अनेक पुरुष व महिला भाविकभक्त उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment