सारा न्यूज नेटवर्क -
चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक-पालक संघाची स्थापना;
नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड
सोलापूर : - नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) जिल्हा शाखा, सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सभेला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक-पालक संघाच्या अध्यक्षा तथा प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार या होत्या. तर पर्यवेक्षक डॉ. बंडोपंत पाटील यांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली.
यावेळी शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारिणीवर शिरीन मंगरुळे, सुकन्या मेनगे, मनीषा तूपदोळकर, सोनाली गजाकोश, नागमणी माढेकर, लॉरेन्स गुमळे, उज्वला जगताप, नसीम शेख, एस्तरा मडरी, अंबादास कुमार, सुनील पगडेकर, अनुराधा म्हेत्रे, सारिका शिवशरण, ज्योती शिंदे, अर्चना माने आणि मारुती पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी शिरीन मंगरुळे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त उपाध्यक्ष व सर्व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पालक प्रतिनिधी मारुती पाटील यांनी शाळेच्या सर्व शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग राहील तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. पालक प्रतिनिधी अन्नपूर्णा श्रीराम यांनी चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे योगदान उल्लेखनीय असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी शिक्षक-पालक संघाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धी, संस्कार आणि कलागुणांच्या विकासासाठी पालक व शिक्षक यांचा समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे अधिक सजगतेने लक्ष देणे ही शिक्षक आणि पालक या दोघांचीही समान जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिल्यास सक्षम, सुसंस्कृत आणि गुणवंत विद्यार्थी घडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत शाळेच्या उज्ज्वल परंपरेला अधिक समृद्ध करण्यासाठी सर्व पालकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बंडोपंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. अस्लम मुलाणी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर मुकुंद शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.




No comments:
Post a Comment