Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, July 20, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत लोकशाहीचा अनोखा अनुभव; शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाची स्थापना..!


सोलापूर :- नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) जिल्हा शाखा, सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली.

                भारतातील लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, यासाठी वर्गप्रतिनिधी व प्रशाला प्रतिनिधी यांच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आल्या. मतदानाचा हक्क, मतदारांची जबाबदारी, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाहीचा आनंद अनुभवला.


            यावेळी शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली. विनायक सोनवणे यांची मुख्यमंत्री, वैभवी माढेकर यांची उपमुख्यमंत्री, अंबिका गायकवाड यांची स्वच्छता मंत्री, सात्विक गायकवाड यांची शिक्षण मंत्री, मदिहा मुल्ला यांची ग्रंथालय मंत्री, स्वाती मरेड्डी यांची पर्यावरण मंत्री, वीरेश म्हेत्रे यांची शिस्त मंत्री, शिवम चिंतामणी यांची सांस्कृतिक मंत्री, साक्षी पट्टाळे यांची आरोग्य मंत्री, राज सुरवसे यांची क्रीडामंत्री तसेच समर्थ माने यांची पाणी व ऊर्जा बचत मंत्री म्हणून निवड करण्यात आली.



            त्यानंतर नूतन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देत त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य, लोकसहभागाचे महत्त्व आणि स्वराज्य ही लोकांसाठी, लोकांनी चालविलेली व्यवस्था असल्याचे सांगितले. शालेय कामकाजातही लोकशाही मूल्ये जपत प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.


               सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अस्लम मुलाणी व अर्चना यलगुलवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्लम मुलाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जोतिबा काटे यांनी मानले.




No comments:

Post a Comment