सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रुप भागात एसटी बसचा खेळखंडोबा.!
रोज एक बस बंद, सीना-भीमा खोऱ्यातील विद्यार्थी व प्रवासी हैराण..
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
सोलापूरहून मंद्रूप सह दक्षिण भागात येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्य एसटी बस चार दिवसात विविध ठिकाणी चारवेळा बंद पडल्या. यामुळे सीना-भीमा खोऱ्यातील महामंडळाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. त्याचा फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, नोकरदार, शेतकरी, महिला तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसला. तेव्हा या भागात सुस्थितीतील एसटी सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मंद्रूप हे सीना-भीमा खोऱ्यातील महत्त्वाचे गाव आहे. परिसरातील अनेक गावासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून दररोज एखादी एसटी बस प्रवासा दरम्यान बंद पडत असल्याने, प्रवाशांना तासन्तास रस्त्यावर थांबावे लागत आहे. काहींना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे. यामुळे सकाळच्या वेळेत मंद्रुप येथील महाविद्यालये व शाळांकडे जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे.
अनेक विद्यार्थी वेळेवर वर्गात पोहोचू शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नोकरदारांनाही कार्यालयात उशिरा पोहोचावे लागत असून सामान्य प्रवाशांनाही याचा फटका बसत आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सोलापूर बस स्थानकामधून धावणाऱ्या काही बस जुन्या व जीर्ण अवस्थेत असून त्यांची नियमित देखभाल होत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.
बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार प्रवाशांची आहे.या पार्श्वभूमीवर मंद्रूप परिसरातील एसटी सेवेकडे तातडीने लक्ष देऊन सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्याव्यात,
बसची नियमित तपासणी करावी तसेच बस नादुरुस्त झाल्यानंतर त्वरित पर्यायी बस पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.


No comments:
Post a Comment