सारा न्यूज नेटवर्क -
मानवतेचा आदर्श.!
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या जोडप्याचा विवाह;
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने बांधली रेशीमगाठ
विशेष बातमी
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
ज्यांच्या आयुष्यात जन्मापासूनच काळोख होता, अशा दोन जिवांच्या जीवनात आज प्रेमाचा, विश्वासाचा आणि आशेचा नवा प्रकाश पडला.
गुरु पौर्णिमेच्या दिवशी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेल्या नवदाम्पत्याचा सोलापूरातील विवाह नोंदणी कार्यालयात भावूक वातावरणात विवाह पार पडला.
टाकळीचे सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, चंद्रशेखर गायगवळी व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या या अनोख्या विवाहाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दिव्यांग बाबुराव बोदली साबळे व हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील दिव्यांग रेखा धोंडप्पा भोरकडे यांचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूरच्या विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह संपन्न झाला. बाबुराव साबळे यांना आई व वडील दोघेही नाहीत. एक भाऊ आहे पण तो उदरनिर्वाहासाठी पालघर येथे राहतो. रेखा भोरकडे यांना आई नाही,तर वडील आजाराने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत रेखा व बाबुराव यांच्या चेहऱ्यावरती आज एक वेगळ्या प्रकारचा आनंद विवाह कार्यालयात दिसून आला.
विवाह नोंदणी अधिकारी एच. व्ही. जाधव यांनी नोंदणी प्रमाणपत्र दिले. सामाजिक कार्यकर्ते, चंद्रशेखर गायगवळी, श्रुती गायगवळी व शेखर साबळे हे या विवाहचे साक्षीदार झाले. दोन्ही नवदांपत्यासह या दोन कुटुंबांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला.
समाजामध्ये एक नवा आदर्श
नशिबाने हिरावली दृष्टी, पण समाजाने दिली साथ.
दृष्टीहीन असल्याने जगण्याचा संघर्ष आणि भविष्याची चिंता या दोघांच्याही पाठीशी होती. विवाह जुळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे दोघेही एका साथीदाराच्या शोधात होते, जो एकमेकांचे दुःखाश्रू पुसू शकेल आणि आधाराची काठी बनू शकेल. ही गोष्ट जेव्हा टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गायगवळी यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी केवळ लग्न जमवण्याचाच नाही, तर तो सन्मानाने पार पाडण्याचा ध्यास घेतला.
निसर्गाने जरी या जोडप्याला दृष्टी दिली नसली, तरी टाकळीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या 'दृष्टीकोना'मुळे आज दोन अंध जिवांचे आयुष्य प्रकाशमय झाले आहे. हा विवाह आजच्या काळात मानवतेची आणि संवेदनशीलतेची एक उत्कृष्ट मिसाल ठरला आहे.
दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू
"डोळ्यांनी आम्ही एकमेकांना पाहू शकत नसलो, तरी मनाने एकमेकांना पूर्ण ओळखतो. समाजाने आणि टाकळी येथील कार्यकर्त्यांनी आज आम्हाला जे नवीन आयुष्य दिलंय, त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहू." असे सांगताना दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
भावूक झालेले नवदांपत्य दिव्यांगांच्या प्रश्नी पुढे यावे
दिव्यांग - अव्यांग या दोन्ही प्रकाराच्या लोकांमध्ये व समाजात प्रबोधन होऊन विवाह होणे गरजेचे आहे. आपल्या समाजानेही त्यांना स्विकारुन सन्मानाने जगण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
टाकळी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, चंद्रशेखर गायगवळी...




No comments:
Post a Comment