सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर ब्रेकिंग - गावठी पिस्तूलसह साडेपाच लाखांची रोकड जप्त, एकाला अटक
एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाला १५ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. नितीननगर येथील कोंडयाल शाळेच्या मागील परिसरात एका तरुणाकडे निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बॅगमध्ये गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
रात्री सुमारे ८.१६ वाजता संशयित रोहित रघुनाथ अहिरे (वय २०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि ५.५० लाखांची रोकड आढळून आली. शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नव्हता.
प्राथमिक चौकशीत रोहित अहिरे याने ही रोकड, पिस्तूल आणि काडतुसे त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड याने काही दिवसांपूर्वी ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. प्रदीपच्या वडिलांना कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्याने, पोलिसांकडून घराची झडती होण्याची शक्यता असल्याने हा मुद्देमाल स्वतःकडे ठेवण्यास दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६७४/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहित अहिरे याला अटक करण्यात आली असून प्रदीप हुसेनी गायकवाड याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस तपासात रोहित अहिरे याच्याविरुद्ध सलगर वस्ती व सदर बाजार पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तर फरार आरोपी प्रदीप गायकवाड याचे वडील हुसेनी शिवाजी गायकवाड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत मालमत्ता व शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याची पडताळणी सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


No comments:
Post a Comment