सारा न्यूज नेटवर्क -
कंदलगावात विजेच्या धक्क्याने ६ वर्षीय मुलाचा मृत्यू;
मुलाला वाचवताना वडील मात्र बचावले..
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
कंदलगाव येथे सोमवारी सायंकाळी शेतातील वस्तीसमोर खेळत असताना वीजेच्या खांबाला स्पर्श करताच आर्थिंग तारेमध्ये उतरलेल्या वीजेचा धक्का बसल्याने ६ वर्षीय चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान वीजेच्या खांबाला चिटकलेल्या मुलाला वाचवताना वडिलांनाही विजेचा धक्का बसला मात्र ते फेकले गेल्याने बचावले.
स्वराज गोरख साठे (वय ६, रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे या चिमुकल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. स्वराज हा सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घराशेजारी खेळत होता. यावेळी त्याचा विजेच्या खांबाला असलेल्या तारेला स्पर्श झाला. तारेमध्ये वीजप्रवाह उतरलेला असल्याने त्याला जोराचा धक्का बसला. यामुळे तो खांबाला चिटकला होता. या वीजेच्या खांबाला चिटकलेल्या मुलाला पाहून वडील गोरख वाचवण्यासाठी धावले.
मुलाला ओढून काढताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. मात्र ते फेकले गेल्याने बचावले.
मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात मुलाला आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर वडिलांवर उपचार करून घरी सोडण्यात आले.
या प्रकरणी कृष्णांत रामचंद्र साठे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात खबर दिली असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास जीपीएसआय राजू राठोड करीत आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे कंदलगाव परिसरात चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.


No comments:
Post a Comment