सारा न्यूज नेटवर्क -
वरातीत डीजेचा धूमधडाका भाडोत्री बायका नाचवल्या :
नवरदेव, मामा, डीजेवाला ट्रॅक्टर चालकासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
सोलापूर (प्रतिनिधी ) :- भाचाचे लग्न धूमधडाक्यात लावण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मामाला लग्नात विनापरवाना डीजे लावणे आणि भाडोत्री महिलांना नाचविण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला आहे. रवी रामसिंग मैनावाले, नवरदेव शुभम गणेश फटफटवाले यांच्यासह पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत वरातीत लावलेला डीजे जप्त केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले.
सोमवारी (ता.२४) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास नवनीत हॉस्पिटल ते वनशितला देवी मंदिर (कंकूबाई हॉस्पिटलमागे) या रोडवर डीजेच्या मोठ्या आवाजात हा नृत्याचा प्रकार सुरू होता. काहीजण दुचाकी गाड्यांचा रेस करीत होते. हुल्लडबाजी देखील सुरू होती. वैतागून काही नागरिकांनी थेट पोलिस उपायुक्तांना फोन केला आणि सदर बझार पोलिसांच्या कानावर तो आवाज पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबविला.
पोलिस हवालदार प्रभाकर देडे यांच्या फिर्यादीवरून नवरदेव शुभम गणेश फटफटवाले (रा. उत्तर सदर बझार), रवी रामलिंग मैनावाले (रा. सतनाम चौक, उत्तर सदर बझार), काकासाहेब अंबादास जाधव (रा. विद्यानगर, पाथरूट चौक), युसूफ पिरजादे (रा. दमाणी नगर) व विशाल अर्जुन पाटील (रा. संजयनगर, कुमठा नाका) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरातीत नेमका काय घडला प्रकार..?
२४ फेब्रुवारीला शुभम फटफटवाले यांचा विवाह झाला, त्याच्या लग्नाची वरात धूमधडाक्यात निघाली. पण, त्यांनी ना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची ना पोलिसांची ना कायद्याची तमा बाळगली. त्यांनी बिनधास्त विनापरवाना डीजे लावला आणि मोठा आवाज सोडला. त्या परिसरात सिव्हिल हॉस्पिटल, कंकूबाई हॉस्पिटल, नवनीत हॉस्पिटल आहेत. परिसरामधील घरांत लहान मुले, वृद्ध नागरिक राहतात. पण, त्याची पर्वा न करता डीजेचा आवाज वाढवून समोर भाडोत्री नृत्यांगना नाचविल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment