Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 18, 2025

बंद घरे शोधून चोरीचा फंडा: शहर गुन्हे शाखेकडून चोरटा जेरबंद 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांची दमदार कारवाई..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

बंद घरे शोधून चोरीचा फंडा: शहर गुन्हे शाखेकडून चोरटा जेरबंद 15 लाखांचा मुद्देमाल जप्त;

 सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांची दमदार कारवाई.. 

सोलापूर (प्रतिनिधी) नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईतून सोलापूर आलेला अमन फय्याज शेख (वय १९, रा. कसाईवाडा, कोहिनूर सिटी, आग्रा रोड, मुंबई) हा पाच दिवस सोलापुरातील नई जिंदगीतील नातेवाइकांकडेच राहिला. नशा करून तो अपार्टमेंटमधील बंद घरे शोधून तेथे चोरी करत होता. त्यानेच जोडभावी पेठेतील शिक्षिकेच्या घरातून पावणेपंधरा लाखांचा ऐवज चोरल्याची बाब समोर आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद करीत १४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शिक्षिका सुरेशा तोडकरी या शनिवारी (ता. १५) शाळेला गेल्यावर त्यांचा मुलगा घरी होता. तो सकाळी दहानंतर त्याच्या मित्रांना भेटायला घराबाहेर पडला आणि हीच संधी साधून

अमन शेख याने त्या शिक्षिकेच्या घरात जाऊन १७ तोळे सात ग्रॅम दागिने व २३ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. त्यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तांत्रिकदृष्ट्या तपास केला. तत्पूर्वी, १२ फेब्रुवारीला तेलंगी पाच्छा पेठेतील फराह रशीद शेख यांच्या 

अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील घरातून त्याने साडेतीन तोळे दागिने व एक लाखाची रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. ही चोरी देखील अमन शेख यानेच केल्याची बाब तपासात समोर आली आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने पार पाडली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment