सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकारांनी सत्याची बाजू घ्यावी; कोणाच्याही दबावाला घाबरू नका – खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर : - सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सी ब्लॉकच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पत्रकार आणि छायाचित्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार मा. प्रणितीताई शिंदे यांच्या शुभहस्ते पत्रकार व छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
रक्षाबंधनाचा दिवस असल्याने प्रणितीताई शिंदे यांनी उपस्थित पत्रकार आणि छायाचित्रकारांना स्वतः राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. त्यानंतर पत्रकार व छायाचित्रकारांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार आणि छायाचित्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
कार्यक्रमात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांना सत्याची बाजू घेण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “पत्रकारांनी कोणालाही घाबरू नये. चुकीचे काम करणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याची चूक ही चूकच आहे. काँग्रेसचा असो किंवा सत्ताधारी पक्षाचा असो, चुकीच्या गोष्टींवर पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे.”
सरकार किंवा प्रशासनाकडून काही चूक झाली असेल तर ती जनतेसमोर आणणे हे माध्यमांचे काम आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच शाळेत पंखा पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्यासारख्या गंभीर घटना माध्यमांनी जनतेसमोर मांडल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
“चुकीचे असेल तर चुकीचे म्हणा आणि बरोबर असेल तर बरोबर म्हणा. कोणत्याही दबावाला घाबरू नका आणि सत्य लपवू नका,” असा स्पष्ट संदेश प्रणिती शिंदे यांनी यावेळी पत्रकारांना दिला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पत्रकारांना राखी बांधून त्यांचा सन्मान केल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. उपस्थित पत्रकार, छायाचित्रकार आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment